कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवराय आणि राजर्षींना अपेक्षित असलेला समाज आणि राज्य निर्माण करण्याचा निश्चय करा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केले. शाहू मिल येथे होणार्या राजर्षी छत्रपती शाहू स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
रयतेचा राजा, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त जिल्ह्यात 'कृतज्ञता पर्व'चे आयोजन करण्यात आले आहे. लोकराजा शाहूंना सकाळी दहा वाजता शंभर सेकंद स्तब्ध राहून आदरांजली वाहण्यात आली. या अनोख्या मानवंदनेनंतर शाहू मिल येथे 'कृतज्ञता सभा' झाली. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऑनलाईन उपस्थिती दर्शवत शाहूंविषयी कृतज्ञता व्यक्त करून आदरांजली वाहिली. अध्यक्षस्थानी शाहू महाराज होते.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, दैनिक 'पुढारी'चे समूह संपादक डॉ. योगेश जाधव प्रामुख्याने उपस्थित होते. राजर्षींची आठवण नाही,
असा एकही दिवस नाही राज्यातील सर्वसामान्य जनतेला राजर्षी शाहू छत्रपतींची आठवण झाली नाही, असा एक दिवसही नसेल, असे सांगत मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, दीनदुबळ्यांच्या हितासाठी सदैव त्यांनी संघर्ष केला. अस्पृश्यांनाही अन्य मनुष्यत्वाप्रमाणे अधिकार दिलेच पाहिजेत, नाही तर आपल्या हातून देशसेवा होणार नाही, असा मार्गदर्शक विचार दिला. अवघी 28 वर्षांची कारकीर्द त्यांना मिळाली. शाहू छत्रपतींना आणखी पाच-पंचवीस वर्षे मिळाली असती, तर या राज्याचे चित्र सामाजिक सुधारणेच्या द़ृष्टीने आणखी किती तरी वेगळे असते.
आपल्या राज्यातील सर्वजण सुखी आणि समाधानी असले पाहिजेत, हे पहिल्याच जाहीरनाम्यात मांडणारे, त्याचबरोबर राजेशाहीसुद्धा मानवतेला जाचक ठरू शकते, असे स्पष्टपणे सांगणारे राजर्षी शाहू छत्रपती खर्या अर्थाने लोकोत्तर राजे असल्याचे सांगून ठाकरे म्हणाले, दीनदुबळ्यांच्या मनातील न्यूनगंड काढून टाकण्याचे काम त्यांनी केले. राजर्षींनी बहुजनांच्या हितासाठी संपूर्ण आयुष्य वाहून घेतलेे होते. असे एकही क्षेत्र नव्हते की, ज्या क्षेत्रात राजर्षी शाहूंनी काम केलेले नाही. आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत; मात्र राजर्षींनी त्यावेळी केलेल्या एकेका कामासाठी स्वातंत्र्यानंतर आता एकेक स्वतंत्र खाती आहेत. इतकी दूरद़ृष्टी असलेले हे राजे होते.
राजर्षींच्या सामाजिक कामांबाबत तत्कालीन मुंबईच्या इंग्रज सरकारने त्यांना तुम्ही जे करताय ते तुमच्या संस्थानात करा, इतरत्र ते करू नका, असे सांगितल्यावर शाहू छत्रपतींनी त्यांना सडेतोड उत्तर दिले होते, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
राज्याच्या अर्थसंकल्पात शाहू स्मारकासाठी निधीची घोषणा झाली नसली, तरी छत्रपती शिवराय, महात्मा फुले, राजर्षी शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा महान विभूतींच्या स्मारकाच्या कामासाठी निधी जाहीर करण्याची गरजच नाही. शाहू मिल येथे राजर्षी शाहूंचे स्मारक उभे केले जाणार आहे. त्यासाठी जो काय निधी लागेल तो महाविकास आघाडीचे सरकार देईल. मुंबई येथे राजर्षी शाहूंच्या नावे बांधण्यात येणार्या भवन आणि स्मृतिस्तंभ आदींबाबतही काय भूमिका घ्यायची, हे लवकरच ठरवू, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
राजर्षी शाहूंचा विचार कोल्हापूरच्या जनतेने टिकवला, जागवला, रुजवला असे सांगत पवार म्हणाले, त्यांचा विचार प्रत्येक पिढीने आता पुढे न्यायला पाहिजे. शाहूंच्या विचारांत सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडवण्याची क्रांतिकारी ताकद आहे. सुधारणावादी, प्रगल्भ विचार कृतीत आणणारा, रयतेची काळजी घेणार्या राजर्षींच्या विचारांचे आपण वारसदार आहोत. त्यांच्या विचारांवर वाटचाल करण्याचा निर्धार करूया, असे आवाहन करत शाहूंचे हे विकासाचे, सुधारणेचे पुरोगामी विचार नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे नेण्याचे काम या कृतज्ञता पर्वामुळे झाल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
संतांनी मांडलेला सामाजिक समतेचा विचार राजर्षींनी कृतीत आणला. राजर्षींचे हेच विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेत आणले. राजर्षी शाहूंचे विचार ताकदीने पुढे नेण्याची जबाबदारी वारसदारांनी कृतीतून पार पाडावी, अशी अपेक्षा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.
देशाला दिशा देण्याचे काम करणार्या राजर्षींनी सरकारने जनतेकडे गेले पाहिजे, ही भावना रुजविण्याचे काम केले. राजर्षींचे विचार राज्?यातील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्?यासाठी राजर्षी शाहूंच्या जीवनचरित्राचे प्रदर्शन महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांत भरविण्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी
केली.
रयतेसाठी राज्य चालविणारे छत्रपती शिवराय व राजर्षी शाहू हे दोनच राजे झाले. दरडोई उत्पन्नात जिल्?हा आघाडीवर राहण्?याचे संपूर्ण श्रेय राजर्षी छत्रपतींना जाते. सध्?या समाजा-समाजांत वाढविली जाणारी तेढ रोखण्?यासाठी राजर्षींच्या समतेच्?या विचारांची आवश्यकता असल्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
कोल्हापूरच्या विकासाचा भोंगा राजर्षींनी सर्वप्रथम वाजविला. त्?यांचीच ही संकल्पना आता स्टार्टअपच्या नावाने राबविली जात आहे. शाहू मिलच्या जागेवर स्मारकाचा आराखडाही तयार करण्?यात आला; मात्र गेल्?या पाच वर्षांत काहीच झाले नाही. हा आराखडा मार्गी लावण्यासाठी आपण मुख्?यमंत्री व उपमुख्?यमंत्री यांना भेटून निधी उपलब्?ध करण्?यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.
राजर्षी छत्रपती शाहूंच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त दि. 18 एप्रिल ते दि. 22 मे या कालावधीत कृतज्ञता पर्व आयोजित केले आहे. त्याची दि. 22 मे रोजी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे व राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत सांगता होणार असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. सांगता झाली, तरीही वर्षभर कार्यक्रम होणार असल्याचे ते म्हणाले.
आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शाहू मिलमधील स्मारकात वस्त्रोद्योगाचा एक भाग असावा, अशी सूचना केली.
शाहू मिल स्मारकासाठी राज्याप्रमाणे केंद्र सरकारने मदत करण्याची जबाबदारी घ्यावी. त्यासाठी आपण प्रयत्न करू. मुंबईमध्ये राजर्षी शाहू छत्रपतींचे स्मारक करावे, अशी सूचना माजी खासदार संभाजीराजे यांनी केली.
अध्यक्षीय भाषणात शाहू महाराज यांनी मानवतावाद, समतावाद कृतीत आणत आपण तशी पावले टाकली पाहिजेत. त्यातून प्रगती करत असतानाही मागे खेचण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रतिगामी शक्तींच्या हातात पुरोगामी कोल्हापूरच काय, महाराष्ट्र आणि देशही जाणार नाही, याची खबरदारी आपण घेतली पाहिजे, असे सांगितले.
याप्रसंगी 'गोकुळ'च्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे अनावरण व 'ग्लीम्प्सेस ऑफ राजर्षी शाहू महाराज' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी शाहू स्मारकाच्या आराखड्याचे सादरीकरण केले. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी स्वागत केले. यावेळी खा. संजय मंडलिक, खा. धैर्यशील माने, आ. पी. एन. पाटील, आ. प्रकाश आबिटकर, आ. राजेश पाटील, आ. राजुबाबा आवळे, माजी आ. मालोजीराजे, 'गोकुळ'चे अध्यक्ष विश्वास पाटील, डॉ. जयसिंगराव पवार आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या नियोजनाविषयी सर्वच वक्?त्?यांनी कौतुक करत पालकमंत्री सतेज पाटील व त्यांच्या प्रशासकीय सहकार्यांचे कौतुक
केले.
शाहू मिलमध्ये झालेल्या कार्यक्रमास जनसागर उसळला होता. प्रथमच शाहू मिलमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती. यात उपस्थित असणार्या शाहू मिलच्या कामगारांना गर्दी पाहून गहिवरून आले. शाहीर राजू राऊत यांनी शाहूंचा पोवाडा सादर केला.
शाहूंचे विचार ऐकतच मोठे झालो आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे व राजर्षी शाहूंचे ऋणानुबंध होते. आजोबा आम्हाला शाहू छत्रपतींचा इतिहास नेहमी सांगत असत. राजर्षी शाहूंचे विचार ऐकतच आम्ही मोठे झाल्याचे सांगून मुख्यमंत्री ठाकरे यांनी प्रबोधनकार ठाकरे व राजर्षी शाहूंच्या आठवणींना उजाळा दिला.
पंधरा दिवसांत कोल्हापुरात सारथी संस्थेसाठी जागा देण्यात आलेली आहे. त्याबाबतचा आराखडा पुढील पंधरा दिवसांत पूर्ण होईल आणि या परिसराचा सर्वांगीण विकास होईल, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित राहिले. इतक्या चांगल्या कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहता न आल्याबद्दल मुख्यमंत्री ठाकरे यांनी प्रारंभीच माफी मागत दिलगिरी व्यक्त केली. कार्यक्रमाला उपस्थित राहता न आल्याचे मोठे दुःख होत असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री पवार यांनीही दिलगिरी व्यक्त केली.