कोल्हापूर : व्यापारी तूट १ लाख ५२ हजार कोटींवर! | पुढारी

कोल्हापूर : व्यापारी तूट १ लाख ५२ हजार कोटींवर!

कोल्हापूर : राजेंद्र जोशी
भारतीय वस्तूंच्या निर्यातीत एप्रिल 2022 मध्ये तब्बल 24 टक्क्यांची वाढ झाली असली, तरी जागतिक बाजारात रशिया-युक्रेन युद्धामुळे वाढलेल्या वस्तूंच्या किमती, वाहतुकीचे दर यामुळे आयातीवर खर्ची पडणार्‍या रकमेतही मोठी वाढ झाली आहे. याच्या एकत्रित परिणामाने एप्रिल महिन्यातील व्यापारी तूट 20.1 बिलियन डॉलर्सवर (सुमारे 1 लाख 52 हजार कोटी) पोहोचली आहे. विशेष म्हणजे सोन्याची आयात या कालावधीत घटली आहे; अन्यथा या तुटीचा आकडा दोन लाख कोटी रुपयांवर गेला असता, अशी स्थिती आहे.

केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने एप्रिल महिन्यातील आयात-निर्यात विषयक अहवाल मंगळवारी प्रसिद्ध केला. अहवालात एप्रिल महिन्यातील निर्यात 38.2 बिलियन डॉलर्सवर पोहोचल्याचे म्हटले आहे. गतवर्षी याच कालावधीत निर्यातीचा आकडा 30.76 बिलियन डॉलर्स होता. ही निर्यातीची पातळी उच्चांकी समजली जात असली, तरी भारताच्या आयातीतही 26.6 टक्क्यांची वाढ नोंदविली गेली आहे. एप्रिल महिन्यात भारतात झालेल्या एकूण आयातीचे प्रमाण 58.3 बिलियन डॉलर्सवर पोहोचले आहे. भारतातील निर्यातीमध्ये पेट्रोलियम पदार्थांच्या निर्यातीत 113.2 टक्क्यांची, इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्यातीत 64 टक्के, तर रासायनिक पदार्थ 26.7 टक्के, औद्योगिक उत्पादने 15.4 टक्के, तयार कपडे 16.4 टक्के आणि औषधे 3.9 टक्के या वस्तूंच्या वाढीचा समावेश आहे. भारतातून जडजवाहिरे, दागिने आणि तांदूळ यांचाही निर्यातीला हातभार असतो. परंतु, एप्रिलमध्ये या दोन्ही वस्तूंची निर्यात अनुक्रमे 2.1 टक्के व 14.2 टक्क्यांनी घसरली.

सोन्याच्या आयातीत 73 टक्के घट

भारतीय आयात वस्तूंमध्ये सोन्याच्या आयातीचा हिस्सा मोठा असतो. तथापि, एप्रिल महिन्यात सोन्याच्या आयातीमध्ये तब्बल 73 टक्क्यांची घट होऊन आता 1.7 बिलियन डॉलर्सपर्यंत खाली आली. सणासुदीचा काळ लक्षात घेऊन सोन्याची आयात मोठ्या प्रमाणात झाली असती, तर आयात-निर्यातीमधील व्यापारी तुटीची दरी आणखी वाढली असती, असे चित्र आहे.

Back to top button