शिवछत्रपतींच्या सुवर्ण ’होन’चे शुक्रवारी प्रदर्शन | पुढारी

शिवछत्रपतींच्या सुवर्ण ’होन’चे शुक्रवारी प्रदर्शन

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे नि:स्सीम शिवभक्‍त होते. करवीर छत्रपती म्हणून पदभार स्वीकारल्यापासून अखेरपर्यंत शिवछत्रपतींच्या स्फूर्ती-प्रेरणादायी इतिहासाच्या जतन-संवर्धन-संरक्षणासाठी त्यांनी कृतिशील कार्य केले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिशताब्दीनिमित्त त्यांच्या शिवप्रेमाच्या पैलूंची माहिती नव्या पिढीला व्हावी, या उद्देशाने संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

शिवछत्रपतींच्या स्वराज्याच्या सार्वभौमत्वाचे व वैभवाचे प्रतीक असणार्‍या ‘सुवर्ण होन’चे (शिवकालीन नाणे) प्रदर्शन एक दिवसासाठी होणार आहे. शुक्रवार दि. 6 मे रोजी भवानी मंडप, जुना राजवाडा येथे सकाळी 10 वाजता, उद्घाटनानंतर रात्री 8 वाजेपर्यंत हा होन सर्वांसाठी पाहण्यास खुला असणार आहे. रायगडवर वास्तव्य असणार्‍या औकीरकर कुटुंबीयांच्या देवघरात पूजनास असणारा हा सुवर्ण होन त्यांनी 6 जून 2021 रोजी राज्याभिषेक समितीकडे सुपूर्द केला आहे. राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी शिवचरित्रातून प्रेरणा घेऊन विविध लोकोपयोगी कामे केली. राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिले काम पेशवाईत बंद पडलेला शिवशक पूर्ववत सुरू केला. पन्हाळगड, जुना राजवाडा व नर्सरी बाग येथे छत्रपती शिवाजी महाराजांची स्मारक मंदिरे उभारली. सिंधुदुर्ग येथे शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराजांनी उभारलेल्या शिवस्मारक मंदिरासमोर भव्य सभामंडप बांधला. किल्ल्याच्या तटावरील शिवरायांच्या हाताच्या ठशाची प्रतिकृती निर्माण करून जुना राजवाड्यातील देवघरात प्रतिष्ठापित केली. जोतिबा यात्रेनंतर शिवरायांचा रथोत्सव सुरू केला. शिवचरित्राच्या लेखनासाठी भरघोस मदत केली. पुणे येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील पहिला अश्‍वारूढ पुतळ्याचा पाया रचला.

Back to top button