कोल्हापूर : तांत्रिक देखावे, पोवाड्यांतून शिवभक्तीचा जागर (Video) | पुढारी

कोल्हापूर : तांत्रिक देखावे, पोवाड्यांतून शिवभक्तीचा जागर (Video)

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : समाजप्रबोधनपर व्याख्याने, स्फूर्तिदायी पोवाडे, मर्दानी खेळांची चितथरारक प्रात्यक्षिके, हलगीचा कडकडाट, धुमकं-कैताळाचा ठेका, जय भवानी…जय शिवाजी असा अखंड जयघोषाने संयुक्त राजारामपुरी, मंगळवार पेठ, रविवार पेठ, बुधवार पेठ, रंकाळा टॉवरसह शहर आणि उपनगरांतील वातावरण शिवमय झाले आहे. लॉकडाऊननंतर शिवजयंतीच्या भव्य-दिव्य सोहळ्यासाठी अवघा जिल्हा सज्ज झाला आहे. भगवे ध्वज, शिवप्रतिमा खरेदीसाठी शिवभक्तांनी गर्दी केली होती. कोल्हापुरातील काही तरुण मंडळांनी मिरवणुकीने शिवप्रतिमांची प्रतिष्ठापना केली. चौका-चौकांत भगवे ध्वज, भगव्या पताकांसह छत्रपती शिवरायांच्या दुर्मीळ फोटोंची भव्य डिजिटल उभारली आहेत.

संयुक्त राजारामपुरी

पारंपरिक वाद्यांचा गजर, नाशिक ढोल, डोळ्यांची पारणे फेडणारी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करत मिरवणुकीने छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची संयुक्त राजारामपुरीने प्रतिष्ठापना केली. मिरवणुकीत भगवे फेटे बांधून मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्या होत्या. ‘जय भवानी,..जय शिवाजी’ अशा घोषणांनी मिरवणूक मार्ग दणाणून गेला. शिवभक्तांना रात्री पावनखिंड चित्रपट दाखविण्यात आला. शिवदिग्विजय मर्दानी आखाडा जरगनगर यांनी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर केली. रविवारी सकाळी 9 ते 11 या वेळेत आरोग्य तपासणी शिबिर, सायंकाळी 6 वाजता जिजाऊ पुरस्कार वितरण, कोरोना योद्ध्यांचा सत्कार, मराठ्यांच्या शौर्यावर आधारित ऐतिहासिक महानाट्याचे सादरीकरण होणार आहे.

संयुक्त रविवार पेठतर्फे पावनखिंडीचा रणसंग्राम

ऐतिहासिक बिंदू चौकात संयुक्त रविवार पेठेतर्फे शिवजयंती उत्सवाचे आयोजन केले आहे. पन्हाळा पावनखिंडीचा तांत्रिक देखावा उभारण्यात आला. बिंदू चौकाच्या बुरुजावर भगवे ध्वज लावले आहेत. आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याने शिवभक्तांचे लक्ष वेधले आहे. शनिवारी पारंपरिक वेशभूषा आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज’ विषयावर भाषण स्पर्धेचे आयोजन केले होते. रात्री ‘पावनखिंडीचा रणसंग्राम’ विषयावर इतिहास अभ्यासक डॉ. अमर आडके यांचे व्याख्यान झाले. पावनखिंड चित्रपट शिवभक्तांना दाखविण्यात आला. यावेळी हर्षल सुर्वे, सुमित पवार, संदीप पाटील, महेश ढवळे, आप्पा लाड, बाळासाहेब मुधोळकर, रवी पाटील उपस्थित होते.

संयुक्त मंगळवार पेठ

संयुक्त मंगळवार पेठेतर्फे मिरजकर तिकटी येथे शिवजयंती उत्सव सोहळा सुरू आहे. शनिवारी ‘जय जय महाराष्?ट्र माझा अखंडित ठेवू महाराष्?ट्र आमचा…’ या गीताने दर्‍याचे वडगाव येथील पंचरत्न शाहिरी पथकाच्या शिवशाहीर प्रकाश लोहार आणि सहकार्‍यांनी शिवजयंती उत्सव सोहळ्याचा तिसरा दिवस गाजविला. डफ-तुणतुण्याच्या साथीने आणि शाहिरांच्या ललकारीने मिरजकर तिकटी हुतात्मा चौक शहारला. चंद्रकांत मुळीक, संभाजी मुळीक, अशोक बनके, वैष्णवी लोहार, सुनील लोहार या शाहिरांनी ‘लेक वाचवा’, ‘जातिभेद गाढा’, ‘व्यसनांपासून दूर राहा’ असे प्रबोधनात्मक पोवाडे, लोकगीतांचे सादीरकरण झाले. अश्वारूढ शिवप्रतिमेचे पूजन आ. ऋतुराज पाटील, यश संजय मंडलिक यांच्या हस्ते झाले.

संयुक्त जुना बुधवार पेठ

संयुक्त जुना बुधवार पेठ सेवाभावी संस्थेच्या वतीने शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे. व्याख्याने, पोवाडे, सोंगी भजनांतून नागरिकांचे प्रबोधन केले जात आहे. शनिवारी बुजवडे (ता. राधानगरी) येथील श्री विठ्ठल प्रासादिक संगीत सोंगी भजन मंडळाने भजनातून प्रबोधनाचा जागर केला. 1 मे रोजी मोटार रॅली काढण्यात येणार आहे, तर सायंकाळी शिवशाहीर दिलीप सावंत यांचा ‘गर्जना महाराष्ट्राची’ हा पोवाड्याचा कार्यक्रम होणार आहे.

बाजीप्रभू देशपांडे यांचा देखावा

रंकाळा टॉवर येथील क्रांती बाईजच्या वतीने रंकाळा टॉवरला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. उंच अशा व्यासपीठावर छत्रपती शिवरायांची मूर्ती ठेवण्यात आली आहे. पावनखिंडीच्या रणसंग्रामाच्या शौर्याचा तांत्रिक देखावा येथे उभारला आहे. येथे सेल्फी घेण्यासाठी शिवभक्तांची गर्दी होत आहे. तसेच शहरासह जिल्ह्यात मंडळांकडून शिवजयंती उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे.

Back to top button