राजर्षी शाहूंनी रयतेच्या विकासाचा भोंगा वाजविला : पालकमंत्री पाटील | पुढारी

राजर्षी शाहूंनी रयतेच्या विकासाचा भोंगा वाजविला : पालकमंत्री पाटील

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा :  लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी आपले संपूर्ण आयुष्य लोककल्याणासाठी खर्च केले. जाती-धर्म-भेदभावाला थारा न देता समतेचा कृतिशील विचार दिला. दूरद़ृष्टीने त्यांनी लोकोपयोगी कार्य उभारले. शाहू मिलसारखी उद्योग केंद्रे उभारून त्यांनी रयतेच्या विकासाचा भोंगा वाजविला होता, असे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.

‘मुखत्यारी समारंभ’ म्हणजेच छत्रपती शाहू महाराज यांचा राज्याधिकार स्वीकारोत्सव या तत्कालीन मुख्याध्यापक बाळाजी महादेव करवडेलिखित दुर्मीळ दस्तावेजावर आधारित इतिहास अभ्यासक यशोधन जोशी संपादित पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात झाले. शाहू महाराज यांच्या हस्ते व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी आ. मालोजीराजे, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. रमेश जाधव यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला.

शाहू महाराज म्हणाले, आजच्या तरुणांनी डोळे झाकून चुकीच्या प्रवाहात वाहत जाण्यापेक्षा राजर्षी शाहूंच्या समतेच्या विचारांचा मार्ग अवलंबावा. कोल्हापुरात आजही पुरोगामी विचारांना महत्त्व असल्याने प्रतिगामी शक्तींना शिरकाव करता येत नसल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी डॉ. रमेश जाधव, लेखक यशोधन जोशी यांची भाषणे झाली. यावेळी शाहूप्रेमी उपस्थित होते. स्वागत- प्रास्ताविक अनिल पवार यांनी, सूत्रसंचालन चेतन कोळी यांनी केले.

भविष्यात नेटवर कोणाचा कंट्रोल असेल, सांगता येणार नाही

पालकमंत्री म्हणाले, माहितीचे महत्त्वपूर्ण माध्यम असणार्‍या नेटवर भविष्यात कोणाचा कंट्रोल असेल, हे सांगता येणार नाही. मात्र, पुस्तकाच्या माध्यमातून लोकांपर्यंत विचार पोहोचणे आवश्यक आहे; कारण त्यावर अद्याप कोणाचा कंट्रोल नसल्याचे त्यांनी सांगितले.

Back to top button