कोल्‍हापूर : अंबाबाई मंदिरात भाविकांच्या पाकिटावर डल्ला, सोलापुरातील महिलेला रंगेहाथ पकडले | पुढारी

कोल्‍हापूर : अंबाबाई मंदिरात भाविकांच्या पाकिटावर डल्ला, सोलापुरातील महिलेला रंगेहाथ पकडले

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरासह परिसरात गर्दीचा फायदा घेऊन भाविकांकडील मौल्यवान वस्तूसह पाकिटावर डल्ला मारणाऱ्या सोलापूर येथील एका सराईत महिलेला जुना राजवाडा पोलीस आणि महालक्ष्मी देवस्थान समितीच्या सुरक्षारक्षकांनी सापळा रचून आज (शुक्रवार) सकाळी पकडले.

सविता गोविंद अवतळे (वय 36, रा. आष्टा कासार, जि. सोलापूर) असे या महिलेचे नाव आहे. महिलेकडून ताब्यात घेतलेल्या पर्समध्ये सात हजार रुपयांची रक्कम आढळून आली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये संबंधित महिलेच्या संशयास्पद हालचाली निदर्शनास आल्याने पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव पोलीस कॉन्स्टेबल राजू कांबळे यांनी तातडीने हालचाल करून दर्शन रांगेतून महिलेला ताब्यात घेतले.

प्रथमतः पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या महिलेवर प्रश्नांचा भडिमार करण्यात आला. चौकशीअंती तिने अंबाबाई मंदिर परिसरातून दोन भाविकांच्या पाकिटावर डल्ला मारण्याची कबुली दिली.

आज सकाळपासून अंबाबाई मंदिरात भाविकांची गर्दी उसळली होती. लांबवर दर्शन रांगा लागल्या होत्या. त्यात रांगेत संशयित महिला भाविकांमधून मागेपुढे करत असल्‍याचा प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला. पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव आणि कॉन्स्टेबल राजू कांबळे यांना संशय आला. त्यांनी संबंधित महिलेला दर्शन रांगेतून चौकशीसाठी ताब्यात घेतले.

या महिलेची पोलीस स्टेशनमध्ये आणून चौकशी केली. दर्शन रांगेमधील गर्दीचा फायदा घेऊन दोन भाविकांचे पाकिटे लंपास केल्याची तिने कबुली दिल्‍याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव यांनी दैनिक पुढारीशी बोलताना सांगितले. संशयित महिलेवर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असेही संदीप जाधव यांनी सांगितले.

Back to top button