शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी जयसिंगपूर नगरपालिकेला जागा देणार | पुढारी

शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी जयसिंगपूर नगरपालिकेला जागा देणार

जयसिंगपूर : पुढारी वृत्तसेवा गेल्या 50 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा, म्युझियम व ग्रंथालयासाठी जागा नगरपालिकेकडे विनामोबदला हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावाला मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे हा प्रकल्प लवकरच पूर्ण होईल, अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर व उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर यांनी दिली.

या निर्णयानंतर शहरात शिवप्रेमींमध्ये उत्साह

निर्माण झाला होता. त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करीत राजर्षी शाहू महाराज व जयसिंग महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून शहरात साखर-पेढे वाटप करण्यात आले.

पुतळा प्रकल्पाची जागा राज्य सरकारच्या मालकीची होती. त्यामुळे ही जागा संपादन करण्यासाठी शासनाकडे 3 कोटी रुपयांचा महसूल भरावा लागणार होता. त्यामुळे ही जागा विनामोबदला पालिकेकडे हस्तांतर करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम व अश्वारूढ पुतळ्यासाठी नगरपालिकेकडे जागा वर्ग करण्याचा निर्णय झाला आहे. दरम्यान, नगरपालिकेच्या राजर्षी शाहू आघाडी आणि ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी एकत्रित पत्रकार बैठक घेत हा निर्णय जाहीर केला.

माजी नगराध्यक्ष प्रा. अस्लम फरास म्हणाले, 1975 पासून शिवपुतळा प्रकल्पाचा प्रश्न प्रलंबित आहे. यासाठी राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, नगराध्यक्षा डॉ. नीता माने, उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर यांच्यासह अनेकांनी हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला. पालिकेच्या अर्थसंकल्पातही याकरिता 3 कोटी 10 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे सांगितले. त्याचबरोबर खासदार धैर्यशील माने व माजी आमदार उल्हास पाटील यांनीही प्रयत्न केले असल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे.

यावेळी आदित्य पाटील-यड्रावकर, संभाजी मोरे, दादा पाटील चिंचवाडकर, महेश कलगुटगी, अर्जुन देशमुख, शीतल गतारे, चंद्रकांत जाधव-घुणकीकर, राजेंद्र अडके, शैलेश आडके, अर्जुन देशमुख, राहुल बंडगर यांच्यासह नगरसेवक व शिवप्रेमी उपस्थित होते.

Back to top button