कोल्हापुरात आजपासून दोन दिवस पहिले मराठी चित्रपट संमेलन होणार | पुढारी

कोल्हापुरात आजपासून दोन दिवस पहिले मराठी चित्रपट संमेलन होणार

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्या वतीने बुधवारपासून दोन दिवस कोल्हापुरात पहिले मराठी चित्रपट संमेलन भरणार आहे. या संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी चित्रपट क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा जीवन गौरव व चित्रकर्मी पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.

केशवराव भोसले नाट्यगृह येथे बुधवारी सकाळी साडेदहा वाजता या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. स्वागताध्यक्ष म्हणून सांस्कृतिक राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, खा. संभाजीराजे, खा. धैर्यशील माने, भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील, संमेलनाध्यक्ष भास्कर जाधव, संमेलन कार्याध्यक्ष अ‍ॅड. मोहनराव पिंपळे उपस्थित राहणार आहेत. जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ दिग्दर्शक भास्कर जाधव यांना जाहीर करण्यात आला आहे. चित्रभूषण पुरस्कार प्रसाद सुर्वे, विलास रकटे, मोहनराव पिंपळे, विजय शिंदे तर चित्रमहारत्न पुरस्कार सतीश रणदिवे, प्रमोद शिंदे, सौ. लता अशोक जाधव, ग्यान नरसिंघानी, आर. के. मेहता, पी. वाय. कोळी, संजय दीक्षित, श्याम बाळकृष्णन यांना देण्यात येणार आहे. चित्रगौरव पुरस्कार (मरणोत्तर) कै. यशवंत भालकर, चंद्रकांत जोशी, रवींद्र पन्हाळकर, प्रकाश हिलगे, सुभाष हिलगे, गिरीश उदाळे, सुरेश उदाळे, गणेश जाधव, जी. जी. भोसले, मनोहर रणदिवे, शांताराम चौगुले, सागर चौगुले, जयसिंग माने यांना जाहीर करण्यात आला आहे.

सकाळी साडेसात वाजता कॅमेरा स्तंभापासून केशवराव भोसले नाट्यगृहापर्यंत चित्र दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दुसर्‍या सत्रात दुपारी 2 वाजता मराठी चित्रपट धोरण यावर खुली चर्चा होणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजता मनोरंजनाचा कार्यक्रम सादर होणार आहे.

दि. 28 रोजी सकाळी सव्वानऊ वाजता ‘माझ्या गाण्याची जन्मकथा’ यावर गीतकार बाबासाहेब सौदागर मनोगत व्यक्त करणार आहेत; तर दुपारी 12 वाजता चित्रपट खरेदी, विक्री व वितरण परिषद या विषयावर चर्चा होऊन अधिवेशनाची सांगता होणार आहे.

Back to top button