मनपा शाळांमध्ये ई -लर्निंग उपक्रमास प्रारंभ | पुढारी

मनपा शाळांमध्ये ई -लर्निंग उपक्रमास प्रारंभ

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

मनपाच्या शाळेत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांनाही तंत्रज्ञानाधिष्ठित व अद्ययावत शिक्षणाच्या प्रवाहात समाविष्ट करण्याच्या हेतूने दै. ‘पुढारी’ संचलित प्रयोग सोशल फाऊंडेशन व विवेकानंद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने व प्राथमिक शिक्षण समिती, मनपा यांच्या सहकार्यातून ई-लर्निंग उपक्रम 58 शाळांत राबवण्यात येणार आहे. याचा शुभारंभ कसबा बावडा येथील राजर्षी शाहू विद्यामंदिर, शाळा क्र. 11 येथे मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.

या उपक्रमांतर्गत इयत्ता 5 वी ते 7 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण दिले जाणार आहे. संगणक ओळख, विंडोज ऑपेरेटिंग सिस्टीम, फाइल्सचे व्यवस्थापन, वर्डपॅड, पेंट, कॅल्क्युलेटर, एक्सेल, इंटरनेट परिचय असा इयत्ता निहाय अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला आहे. या उपक्रमाचा लाभ चार हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना होणार आहे. ‘विवेकानंद’चे डॉ. विशाल वाघमारे, राजश्री पाटील-शेंद्रे यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले.

यावेळी केंद्र मुख्याध्यापक डॉ. अजितकुमार पाटील, उत्तम कुंभार, सुशील जाधव, सुजाता आवटी, तमेजा मुजावर, शिवशंभू गाटे, आसमा तांबोळी,कल्पना मैलारी आदींची उपस्थिती होती.

राजर्षी शाहूंच्या माहितीपटाचे सादरीकरण

लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतिशताब्दीनिमित्त विद्यार्थ्यांना दै. ‘पुढारी’च्या वतीने यू-ट्यूब चॅनेलवर प्रसारित केलेल्या राधानगरी धरण, हत्तीमहाल, साठमारी, दाजीपूर अभयारण्य या ऐतिहासिक स्थळांच्या चित्रफिती आवर्जून दाखवण्यात आल्या. चित्रफीत निर्मिती प्रक्रिया कशा पद्धतीने होते याची तांत्रिक माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.

कोल्हापूर : कसबा बावडा येथील राजर्षी शाहू विद्यामंदिर येथे ई-लर्निंग उपक्रमात सहभागी विद्यार्थी आणि शिक्षक.(छाया : पप्पू अत्तार)

Back to top button