कोल्हापूर : गर्भपात रॅकेटमधील भगवान कारंडेला अटक | पुढारी

कोल्हापूर : गर्भपात रॅकेटमधील भगवान कारंडेला अटक

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : बेकायदा गर्भपात करणार्‍या रॅकेटमधील फरारी असलेल्या भगवान सखाराम कारंडे (वय 50, रा. पणुत्रे, मूळ गाव पुनाळ, ता. पन्हाळा) या संशयिताला पन्हाळा पोलिसांनी सोमवारी अटक केली. विशेष पथकाने रंकाळा व पडळ येथे छापा टाकून तिघांना अटक केल्यानंतर संशयित पसार झाला होता.

मुख्य संशयित उमेश लक्ष्मण पोवार, हर्षल नाईक व दत्तात्रय शिंदे यांच्या चौकशीत भगवान कारंडे याचे नाव समोर आले होते. पोलिस उपनिरीक्षक रमेश ठाणेकर व त्यांच्या पथकाने ठिकठिकाणी त्याचा शोध घेतला. मात्र पोलिसांची चाहूल लागताच तो पसार होत असे. पहाटेच्या वेळी पथकाने छापा टाकून त्याला पणुत्रे या त्याच्या गावातूनच अटक केली. पन्हाळा मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांनी त्याला 27 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

कारंडेला यापूर्वीही गर्भपात व गर्भलिंग निदानप्रकरणी दाखल गुन्ह्यात अटक झालेली होती. गर्भपाताच्या गोळ्या पुरविण्याची त्याच्यावर जबाबदारी होती. या गोळ्या त्याने कुठून व कोणाकडून आणल्या याची चौकशी केली जाणार आहे. रॅकेटमधील आणखी काही संशयितांची नावे चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे.

Back to top button