कोल्हापूर ग्रामीण भागात दीड ते दोन तास भारनियमन

कोल्हापूर ग्रामीण भागात दीड ते दोन तास भारनियमन

कोल्हापूर; सुनील सकटे : राज्यातील वीज संकटाचा फटका कोल्हापूरलाही बसला आहे. कोल्हापूर आणि इचलकरंजी शहर वगळता ग्रामीण भागात सुमारे एक ते दीड तास भारनियमन केले जात आहे. ऐन उन्हाळ्यात वीजपुरवठा खंडित झाल्याने त्रस्त नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

कोळसाटंचाईमुळे विजेची मागणी आणि पुरवठ्यात मोठी तफावत निर्माण झाल्याने राज्यात भारनियमन सुरू आहे. महावितरण कंपनीने वीज बिल वसुली, वीज चोरी आणि गळतीच्या निकषानुसार फिडरचे वर्गीकरण केले आहे. ए, बी, सी, डी, ई, एफ, जी 1, जी 2, जी 3 असे गट करून भारनियमन सुरू केले आहे. विजेची टंचाई सुरू होताच 'जी 3' या गटापासून भारनियमनाची सुरुवात होते.

कोल्हापूर आणि इचलकरंजी शहरातील बहुतांश फिडर 'ए' आणि 'बी' गटात येतात. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी भारनियमनाचा फटका बसला नाही. सध्या सी ते जी 3 या सर्व गटांतील फिडरवरून भारनियमन सुरू आहे. त्यामुळे शहर वगळता संपूर्ण जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात भारनियमनाचा झटका लोकांना सहन करावा लागत आहे.

'या' भागांत भारनियमन

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ग्राहकांचा किमान दोन तास वीजपुरवठा खंडित केला जात आहे. आजरा, चंदगड, कागल, करवीरचा ग्रामीण भाग, गडहिंग्लज, शाहूवाडी, हातकणंगले, पन्हाळा आदी परिसरातील गावांना भारनियमनाचा फटका बसला आहे. वीजटंचाई वाढत गेल्यास भारनियमनाची गावे वाढण्याची शक्यता आहे.

काही दिवस भारनियमन सहन करा ः ऊर्जामंत्री

अदानी वीज कंपनीने महावितरणचा वीजपुरवठा बंद केल्याने राज्यावर भारनियमनाचे संकट उद्भवल्याचा आरोप ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केला. काही दिवस भारनियमन सहन करण्याचे आवाहन त्यांनी केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news