कोल्हापूर : पाठबळ द्या, मी ऑलिम्पिक पदक जिंकेन | पुढारी

कोल्हापूर : पाठबळ द्या, मी ऑलिम्पिक पदक जिंकेन

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कुस्तीप्रेमींनी मला भक्कम पाठबळ द्यावे. मी ऑलिम्पिक पदक निश्चित जिंकून आणेन, असा विश्वास महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याने व्यक्त केला. 21 वर्षांचा दुष्काळ संपवून कोल्हापूर जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीची मानाची गदा आणणार्‍या पृथ्वीराज व इतर गटातील पदकप्राप्त मल्लांचा नागरी सत्कार शुक्रवारी जुना राजवाड्यातील भवानी मंडप येथे झाला.

शाहू महाराज, पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, ‘केएसए’चे अध्यक्ष मालोजीराजे, खा. संजय मंडलिक, खा. धैर्यशील माने, आ. पी. एन. पाटील, आ. राजेश पाटील, आ. जयंत आसगावकर, यशराजराजे, ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील, राहुल आवाडे यांच्या हस्ते सर्व पैलवानांना गौरविण्यात आले. यावेळी आर. के. पवार, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, सचिन चव्हाण, विजय देवणे, अदिल फरास, हिंदकेसरी दिनानाथसिंह, हिंदकेसरी विनोद चौगुले, पै. संभाजी वरुटे, पै. विष्णू जोशीलकर, पै. अमृत भोसले, वस्ताद राम पवार आदी उपस्थित होते. खा. संभाजीराजे व राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांना उपस्थित राहता न आल्याने त्यांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन करण्यात आले. कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाने या सोहळ्याचे आयोजन केले होते.

पुढची महाराष्ट्र केसरी स्पर्धा खासबागेत : पालकमंत्री

पुढची महाराष्ट्र केसरी स्पर्धा राजर्षी शाहू खासबाग मैदानात घेण्यासाठी दि. 23 रोजी कोल्हापूर दौर्‍यावर असणारे मार्गदर्शक शरद पवार यांना शिष्टमंडळासह भेटणार असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले. महाविकास आघाडीने पृथ्वीराजला जाहीर केलेले 5 लाखांचे बक्षीस त्याच्या घरी जाऊन लवकरच देण्यात येईल. तालीम मंडळांना निधी देण्याच्या योजना मालोजीराजे यांनी सुरू केली. ती कायमपणे सुरू ठेवत भविष्यात कोल्हापूरच्या कुस्ती विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणे, राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये प्रत्येक गटातील मल्लांना रोख बक्षिसांची तरतूद करणे आणि राजर्षी शाहू स्मृतिवर्षानिमित्त होणार्‍या ‘कृतज्ञता पर्व’अंतर्गत खासबाग कुस्ती मैदनात कुस्ती मैदानांच्या आयोजनाची ग्वाही पालकमंत्री पाटील यांनी दिली. मंत्री मुश्रीफ यांनीही याला दुजोरा देत कुस्तीच्या विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्नांची ग्वाही दिली.

पैलवानांच्या वसतिगृहास 30 लाख : खा. मंडलिक

मोतिबाग तालमीतील मल्लांसाठी होणार्‍या वसतिगृहाकरिता सदाशिवराव मंडलिक फाऊंडेशनतर्फे 30 लाख रुपये देण्याची घोषणा खा. संजय मंडलिक यांनी केली. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याला 1 लाख 51 हजार रुपयांचे बक्षीसही त्यांनी जाहीर केले.

सर्व मल्लांचा यथोचित गौरव : शाहू महाराज

सत्कार सोहळ्यानिमित्त शाहू महाराज यांनी पृथ्वीराज पाटील याचा गौरव 1 लाख रुपयांचा धनादेश देऊन केला. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत यश मिळविणार्‍या इतर खेळाडूंचाही यथोचित गौरव करण्याची सूचना मालोजीराजे यांनी केली. तालीम संघाचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी स्वागत केले. प्रास्ताविक अ‍ॅड. महादेवराव आडगुळे यांनी केले. सूत्रसंचालन बटू जाधव यांनी केले. हिंदकेसरी दिनानाथसिंह यांनी आभार मानले.

यांचा झाला गौरव…

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या विविध वयोगटांत पदकांची लयलूट करणार्‍या 18 मल्लांचा गौरव यावेळी करण्यात आला. यात पृथ्वीराज पाटील (देवठाणे-सुवर्ण पदक), सुशांत तांबुळकर (पाचाकटेवाडी – सुवर्ण), किरण पाटील (इस्पुर्ली – कांस्य), भगतसिंह खोत (माळवाडी -कांस्य), स्वप्निल पाटील (वाकरे -कांस्य), सोनबा गोंगाणे (निगवे-सुवर्ण), सौरभ पाटील (राशिवडे-सुवर्ण), अतुल चेचर (पोर्ले-कांस्य), संग्राम पाटील (आमशी-कांस्य), विजय पाटील (पासार्डे-सुवर्ण), अमोल बोंगार्डे (बानगे-कांस्य), बाबासाहेब रानगे (आरे-कांस्य), ऋषीकेश पाटील (बानगे-रौप्य), अनिल चव्हाण (नंदगाव-सुवर्ण), नीलेश हिरुगडे (बानगे-कांस्य), ओंकार लाड (राशिवडे – रौप्य), अक्षय ढेरे (एकोंडी -कांस्य), प्रवीण पाटील (चाफोडी-कांस्य).

पृथ्वीराजची कोल्हापूर शहरातून मिरवणूक

महाराष्ट्र केसरी किताब पटकाविणार्‍या पृथ्वीराज पाटीलची मिरवणूक कोल्हापूर शहरातून काढण्यात आली. दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याजवळ मिरवणूक पोहोचताच हलगीचा कडकडाट आणि आतषबाजी करण्यात आली. यानंतर राजर्षी शाहूंच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. प्रसारमाध्यमांशी बोलताना पृथ्वीराजने ‘शाहूनगरी’ कोल्हापूरसाठी आपण ऑलिम्पिक पदक पटकावल्यानंतरच कुस्तीप्रेमींनी माझी हत्तीवरून मिरवणूक काढावी, अशी इच्छा व्यक्त केली.

Back to top button