कोल्हापूर : तोतया पोलिसांकडून तीन ठिकाणी लूट | पुढारी

कोल्हापूर : तोतया पोलिसांकडून तीन ठिकाणी लूट

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

पोलिस इन्स्पेक्टर असल्याचा बहाणा करून दागिन्यांसह रोकड लुटणार्‍या तोतयांची शहरात अजूनही भामटेगिरी सुरूच आहे. जवाहरनगर येथील मध्यवर्ती चौकात कलावती मंदिरासमोर पोलिस असल्याची बतावणी करून दोघा भामट्यांनी 64 वर्षीय महिलेला गंडा घालून 60 हजार रुपये किमतीची मोहनमाळ लंपास केली.

श्रीमती आशा बाळासाहेब शिंदे (रा. सोनार सोसायटी, जवाहरनगर) यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात दोन अनोळखी भामट्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. गुरुवारी दुपारी बारा वाजता ही घटना घडली. वयोवृद्ध महिला मंदिरासमोरील रस्त्यावरून घराकडे जात असताना दोन अनोळखी तरुणांनी त्यांना थांबविले. आम्ही पोलिस इन्स्पेक्टर असून बंदोबस्तासाठी ड्युटीवर आहोत. शहरात ठिकठिकाणी गर्दी असल्याने गळ्यातील सोन्याचे दागिने काढून पिशवीत ठेवा, असे सांगितले.

पुडीत आढळले दगडांचे खडे!

भामट्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून वृद्धेने गळ्यातील 60 हजार रुपये किमतीचा सोन्याचा मोहनमाळ गळ्यातून काढली. संशयिताने त्याच्यासमोर पांढर्‍या रंगाचा कागद करून त्यात दागिने ठेवण्यास भाग पाडले. त्याची पुडी बांधून भामट्यानी पिशवीत ठेवली. काही वेळाने वृद्धेला संशय आला. त्यांनी पुडी उघडली असता, त्यामध्ये दोन खडे आढळून आले. त्यांनी राजारामपुरी पोलिस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली.

वृद्धेच्या बांगड्या लांबवल्या

गारगोटी : गारगोटी बसस्थानकासमोर पोलिस असल्याची बतावणी करून वृद्धेच्या चार तोळ्याच्या सुमारे दोन लाख रुपयांच्या बांगड्या लंपास केल्याची घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. या चोरीची नोंद भुदरगड पोलिस ठाण्यात झाली आहे. साई कॉलनीतील शोभा मारुती सावंत गुरुवारी सायंकाळच्या सुमारास कोल्हापूरला जाण्यासाठी बसस्थानकाकडे जाताना चोरट्यांनी पोलिस पुढे चेकिंग चालू आहे. त्यामुळे हातातील सोन्याच्या बांगड्या काढून ठेवा. असे सांगून पिशवीत ठेवण्याचा बहाणा करून नकली पाटल्या पिशवीत ठेवून पोबारा केला.

साडेसहा तोळे दागिने लुटले

गडहिंग्लज : येथील डॉक्टर कॉलनीमध्ये पोलिस असल्याचे सांगून दोन वृद्ध महिलांचे साडेसहा तोळे दागिने लुटल्याची घटना गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. पोलिस असल्याचे सांगून यातील दोन्ही वृद्ध महिलांना त्यांच्या अंगावरील दागिने काढून ठेवण्यास सांगितले. यातच हातचलाखी करून हे दागिने लंपास केले. साडेसहा तोळे दागिने गेल्याने या दोन्ही वृद्ध महिलांना धसका बसला असून रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचेकाम सुरू होते.

सीसीटीव्ही फुटेजद्वारे संशयितांचा शोध

पोलिस निरीक्षक इश्वर ओमासे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजद्वारे संशयिताचा शोध घेण्यात येत आहे, असे ते म्हणाले. पोलिस असल्याची बतावणी करून अलीकडच्या काळात 5 जणांना हातोहात लुटल्याच्या घटना घडल्या आहेत.

Back to top button