कोल्हापूर, इचलकरंजीला भारनियमनातून दिलासा | पुढारी

कोल्हापूर, इचलकरंजीला भारनियमनातून दिलासा

कोल्हापूर/ इचलकरंजी : पुढारी वृत्तसेवा

कोळसा टंचाईमुळे राज्यावर भारनियमनाचे संकट ओढवणार असले तरी या भारनियमनाची कोल्हापूरसह इचलकरंजी शहराला फारशी झळ बसणार नाही. चांगली वसुली, थकबाकी आणि गळतीचे अत्यल्प प्रमाण यामुळे वीज ग्राहकांना भारनियमनातून दिलासा मिळणार आहे. मात्र, शेती पंपांसह ग्रामीण भागात दोन तासांचे भारनियमन सुरू झाले आहे.

कोळसा टंचाईमुळे वीजनिर्मिती केंद्रे पूर्णक्षमतेने सुरू नाहीत. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात वीज टंचाईचा सामना करावा लागत आहे. एका बाजूला कडक उन्हाच्या झळा आणि दुसर्‍या बाजूला होऊ घातलेल्या भारनियमनामुळे उपलब्ध वीज काटकसरीनेच वापरावी लागणार आहे. तरीही किमान तीन महिने राज्यात भारनियमन अटळ आहे. किमान आठ तास भारनियमन करावे लागणार असल्याचे स्पष्ट संकेत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी
दिले.

शेती पंपांना रात्री चार, तर दिवसा दोन तास भारनियमन

घरगुती, औद्योगिक व्यापारी ग्राहकांची भारनियमनातून सुटका झाली असली तरी शेती पंपांना मात्र फटका बसला आहे. शेती पंपांचे भारनियमन सुरूच राहणार आहे. सध्या शेती पंपांना रात्री चार तास, तर दिवसा दोन तास भारनियमन सुरू केले आहे.

Back to top button