कोल्हापूर : हातकणंगले येथील अपहृत व्यापार्‍याचा खून | पुढारी

कोल्हापूर : हातकणंगले येथील अपहृत व्यापार्‍याचा खून

हातकणंगले ; पुढारी वृत्तसेवा : येथील बेपत्ता टिंबर व्यापारी दीपक हिरालाल पटेल (वय 34) याचा खून करून मृतदेह राधानगरी तालुक्यातील पाटपन्हाळा येथे पुरून ठेवल्याचे तब्बल अठरा दिवसांनी बुधवारी उघडकीस आले. हा खून 15 लाख रुपयांच्या खंडणीसाठी झाला असल्याची तक्रार देण्यात आली होती; तर पोलिसांनी पैशाच्या प्रकरणातूनच हा खून झाला असावा, असा संशय व्यक्‍त केला आहे. याप्रकरणी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. या घटनेने पटेल कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

26 मार्च रोजी दीपक पटेल याचे अपहरण झाल्याची तक्रार हातकणंगले पोलिसांत दाखल झाल्यानंतर तपास यंत्रणेने वेग घेतला. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या आदेशानुसार, हातकणंगलेचे पोलिस निरीक्षक के. एन. पाटील यांनी चार पथके तैनात केली होती. राधानगरीसह कोल्हापूर जिल्हा तसेच कर्नाटकच्या काही भागांत पथकांनी तपास केला. परंतु, माग लागला नाही.

15 लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास पथकांनी जंग जंग पछाडले होते. पट्टणकोडोली येथे या व्यापार्‍याची दुचाकी मिळाली होती, तर त्याच्या मोबाईलचे लोकेशन सदलगा (कर्नाटक) येथे मिळाले होते.

फोन एस.टी. बसमध्ये आढळला

अपहरणाच्या दोन दिवसांनंतर दीपकने नातेवाईकांबरोबर संभाषण केले होते. त्यानंतर त्याचा मोबाईल बंद होता. दोन दिवसांपूर्वी सोलापूरकडे निघालेल्या एस.टी. बसमध्ये सीटच्या खाली हा मोबाईल लपवण्यात आल्याचे एका जोडप्यास आढळले. त्यांनी हा मोबाईल सुरू केल्यावर यावर दीपकच्या हैदराबादच्या बहिणीचा फोन आला. तिने दीपकविषयी विचारणा करताच संबंधित जोडप्याने हा फोन बसमध्ये सापडल्याचे सांगितले.

त्यानंतर हा फोन हातकणंगले पोलिसांकडे देण्यात आला होता. पोलिसांनी मोबाईलवरील कॉल डिटेल्स आणि लोकेशनद्वारे तपासाची यंत्रणा गतिमान केली.

काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश

कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यावर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा काळीज पिळवटून टाकणारा होता.

अनेकांशी आर्थिक हितसंबंध

दीपक पटेल हा मूळचा राधानगरी तालुक्यातील असून, तो नातेवाईकांसह व्यवसायानिमित्त हातकणंगलेत बर्‍याच वर्षांपूर्वी स्थायिक झाला होता. बिटकॉईन ट्रेडिंगमध्ये त्याला तीन वर्षांपूर्वी खूप फायदा झाल्याचे समजते. यातूनच त्याचे अनेकांशी आर्थिक हितसंबंध असल्याचे स्पष्ट झाले होते. या प्रकरणातूनच त्याचे अपहरण झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. मृत दीपकच्या मागे आई, वडील, पत्नी, एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

याप्रकरणी चार संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांची नावे अद्याप पोलिसांनी जाहीर केलेली नाहीत.

…आणि खुनाला वाचा फुटली

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक राधानगरी येथे असताना त्यांना पाटपन्हाळा येथे एका शेतात दीपकचा खून करून मृतदेह पुरून ठेवल्याची माहिती खबर्‍याकडून मिळाली. पोलिसांनी तेथे शोध घेतला असता पुरण्यात आलेला मृतदेह सापडला आणि या खुनाला वाचा फुटली.

हेही वाचलतं का?

Back to top button