कोल्हापूर : तोफ, घंटा, घोड्याला विशेष मान | पुढारी

कोल्हापूर : तोफ, घंटा, घोड्याला विशेष मान

कोल्हापूर : सागर यादव

दख्खनचा राजा जोतिबाच्या धार्मिक विधींमध्ये तोफ, घोडा-उंट आणि महाघंटा यांनाही विशेष मान आहे. किंबहुना, जोतिबाचे वाहन घोडा असल्याने त्याला विशेष महत्त्व आहे. यामुळेच प्रत्येक शनिवारी जोतिबाची घोड्यावर बसलेली पूजा बांधली जाते. यावेळी मानाचा घोडा मंदिराच्या मुख्य कमानीत पूजा उतरेपर्यंत उभा केला जातो. रविवारी दुपारी व रात्री निघणार्‍या पालखीपुढे उंट-घोडा असतोच.

जोतिबा डोंगरावरील पालखी सोहळे, पूजाअर्चा, धुपारती यावेळी घोडा व उंट सहभागी होतातच. याशिवाय चैत्र यात्रेत लाखोंच्या संख्येने सहभागी भाविक जोतिबा बरोबरच घोडा व उंटाचे दर्शन घेऊन त्यांच्यावर गुलाल-खोबर्‍याची उधळण आवर्जून करतात. घोडे व उंटाचे नियोजन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापक समितीकडे आहे.

यंदा धडाडणार नवी तोफ

जोतिबा देवाच्या सर्व धार्मिक कार्याच्यावेळी तोफेची सलामी देण्याची पूर्वापार प्रथा आहे. जुनी तोफ खराब झाल्याने देवस्थान समितीने पर्यायी तोफ उपलब्ध करून दिली आहे. यामुळे आगामी जोतिबा यात्रेत नवी तोफ जोतिबा डोंगरावर धडधडणार आहे.

जोतिबाची महाघंटा

जोतिबाच्या मंदिरात परंपरेप्रमाणे महाघंटा वाजविली जाते. जोतिबाची महाघंटा पहाटे चार वाजता वाजवून मंदिर उघडले जाते. तसेच भंडारा, महाप्रसादादिवशीही वाजविली जाते. पाकाळणीच्यावेळी मंदिर व परिसर स्वच्छ करण्यासाठी डोंगरावरील हक्कदार गुरव लोकांना व भक्तांना एकत्र येण्यासाठी इशारा किंवा सूचना म्हणूनही ही घंटा वाजविली जाते. डोंगर व मंदिर परिसरातील संकट किंवा धोक्याचा इशारा म्हणून ही महाघंटा वाजविली जाते. अशा वेळी संपूर्ण गावातील नागरिक तत्काळ मंदिर परिसरात एकत्रित येतात.

हिम्मत बहाद्दरांचा मानाचा घोडा

दख्खनचा राजा जोतिबा देवालयाच्या धार्मिक कार्यासाठी घोडा देण्याचा मान निगवे दुमाला (ता. करवीर) येथील ‘हिम्मत बहाद्दर’ चव्हाण घराण्याला आहे. त्यानुसार अनेक पिढ्यांपासून ही परंपरा जपण्यात आली आहे. त्यांच्याकडून दिलेल्या उन्मेश या घोड्याचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. यामुळे राजेंद्रसिंह दिलीपसिंह चव्हाण (हिम्मत बहाद्दर) यांनी जोतिबासाठी नवीन घोडा हर्दा (मध्यप्रदेश) येथून आणला आहे. पांढरा शुभ—, देवमनाचा, डोळ्यावर भोवरा असणारा आणि मेषराशीचा हा घोडा असून त्याचे वय 13 महिने आहे. सध्या त्याचे नाव लखन असून जोतिबावर आणल्यानंतर त्याचे नामकरण होणार आहे. घोड्यासाठी मानसिंग गायकवाड, स्वप्नी उणेचा यांनी विशेष परिश्रम घेतले.

Back to top button