कोल्हापूर पोटनिवडणुकीत राजकीय नेत्यांनी भरविला ‘बोरीचा बार’
कोल्हापूर; राजेंद्र जोशी : कोल्हापुरात शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा पहिला टप्पा सुरू झाला आहे. या निवडणुकीत परंपरेप्रमाणे स्थानिक नेत्यांनी परस्परांवर चिखलफेक सुरू केली आहे. अंतिम टप्प्यापर्यंत त्याचे स्वरूप 'बोरीच्या बारा'प्रमाणे होईल. सतत निवडणुकांचा उत्सव अनुभवणार्या जनतेची यामुळे काही प्रमाणात करमणूकही होईल; पण कोल्हापूर शहराच्या विकासावर कोण बोलणार? असा प्रश्न जनतेनेच विचारला पाहिजे; अन्यथा महाराष्ट्रातील अन्य शहरे कोल्हापूरमागून पुढे प्रगतिपथावर निघून जातील आणि कोल्हापूर हे मोठे खेडे, हीच ओळख अधिक ठळक झाल्याशिवाय राहणार नाही.
कोल्हापुरातील गेल्या तीन दशकांतील निवडणुकीचा काळ आठवा! प्रथम मंडलिक-घाटगे आणि नंतर मंडलिक-मुश्रीफ, आवाडे-माने, आवळे-आवाडे, कोरे-पाटील, गायकवाड-सरूडकर, खानविलकर-महाडिक, शिंदे-कुपेकर आणि गेली काही वर्षे मुन्ना-बंटी. या राजकारणात या जोड्या प्रसिद्ध झाल्या आणि त्यांच्याच भोवती कोल्हापूरचे राजकारण फिरत राहिले. निवडणुका आल्या की, दोन्ही प्रतिस्पर्धी एकमेकांविरुद्ध चिखलफेक करण्यासाठी बार भरून तयार. यातून बार उडाले, राजकीय वस्त्रहरण झाले; पण कोल्हापूर विकासाच्या क्षितिजावर मात्र शून्याभोवतीच फिरत राहिले. त्यातल्या त्यात पहिल्या दोन दशकांत काळम्मावाडीचे पाणी शिवारात फिरू लागले. रेल्वेस्थानकाचे थोडे रुपडे बदलले. उजळाईवाडीला विमान उतरले. तीन औद्योगिक वसाहती, डझनभर साखर कारखाने उभारले, हे वास्तव नाकारता येत नाही; पण डझनभर सूतगिरण्या चात्या फिरण्याअगोदरच बंद पडल्या. राजर्षींनी मोठ्या दूरदृष्टीने उभारलेल्या शाहू मिलचे धुराडे बंद झाले. सरकारी शाळा बंद पडू लागल्या. त्याचबरोबर कोल्हापूरवर प्रदूषणाचा मोठा शिक्काही बसला. या सर्वांमध्ये कोल्हापूर विकासाच्या महामार्गावर कोठे आहे, असा प्रश्न विचारण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळेच तुमचे व्यक्तिगत राजकारण थांबवा आणि कोल्हापूरच्या विकासावर बोला, असे म्हणण्याची वेळ सर्वसामान्य मतदारांवर येऊन ठेपली आहे.
कोल्हापूर शहरात शाश्वत विकास करण्याऐवजी जनतेला विकासाचे स्वप्न दाखविण्याची जणू एक फॅशन बनली आहे. प्रत्येक निवडणुकीत राजकीय व्यासपीठावरून हे विषय चघळायचे. जनतेला स्वप्नात गुंतवण्यासाठी नशेची गोळी द्यायची आणि निवडणुका झाल्या की, पुन्हा पहिले पाढे पंचावन्न! कधी तरी निधीचे तुकडे टाकले जातातही; पण प्रकल्प केव्हा पूर्ण होणार? याचे उत्तर सध्या तरी मिळत नाही. शाहू मिलच्या जागेवर गारमेंट पार्क होणार होते. कोल्हापूर शहराला काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईनद्वारे पाणी मिळण्याच्या मागणीसाठी तत्कालीन महापौर रामभाऊ फाळके यांनी राजीनामा दिला होता. त्याला 32 वर्षे उलटून गेली. अद्यापही हे पाणी कोल्हापुरात पडायचे आहे. शहरातील रस्ते, उड्डाणपूल, भुयारी मार्ग, आयटी पार्क अशी एक नव्हे, शंभर स्वप्ने दाखविली गेली. इतकेच काय, शहराच्या महापालिकेला अद्याप स्वतःची नवी वास्तू बांधता आली नाही. महाराष्ट्राच्या निर्मितीवेळी मुंबई, पुणे, नागपूरनंतर कोल्हापूर विकासाची क्षमता असलेले राज्यातील चौथ्या क्रमांकाचे शहर होते. आज त्यामागे असलेली नाशिक, औरंगाबादसारखी शहरे किती तरी पुढे निघून गेली. तेथे रस्ते प्रशस्त झाले. त्यावर उड्डाणपूल झाले. मेट्रो धावू लागल्या. एकाच्या जोडीला दोन-दोन विमानतळे आली; पण कोल्हापुरात रस्ते सोडा, उड्डाणपूल सोडा, रेल्वेस्थानकाच्या गाड्यांची संख्या कमी झाली आणि विमानाची उड्डाणेही थांबू लागली आहेत.
कोल्हापूरचा विकास शून्याभोवतीच
कोल्हापूर हे भारताच्या नकाशात दरडोई उत्पन्नाच्या कसोटीवर पहिल्या पाच शहरांत मोजले जाते; पण सरासरी उत्पन्नाची ही आकडेवारी असली, तरी ही सरासरी कोणाच्या उत्पन्नामुळे वाढली? कोणा घराण्यांची सांपत्तिक सूज वाढली, याचाही विचार करण्याची वेळ आली आहे. नाही तर निवडणुका येतील, मतदार मतदान करतील आणि कोल्हापूरचा विकास शून्याभोवतीच घुटमळत राहण्याचा धोका आहे.
(क्रमशः)