मुख्यमंत्री ठाकरे यांचा फोन आणि फडणवीस यांचा प्रतिसाद | पुढारी

मुख्यमंत्री ठाकरे यांचा फोन आणि फडणवीस यांचा प्रतिसाद

कोल्हापूर ः पुढारी वृत्तसेवा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री तसेच विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोल्हापुरातील शाहूपुरी कुंभार गल्लीत पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी एकत्र आले आणि सर्वांसाठी ही ब्रेकिंग न्यूज ठरली. मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडून फडणवीस यांना आपण पूरग्रस्त भागाची पाहणी करीत आहात. मीही तेथे येतोय. आपण एकत्र पाहणी करू, असा फोन गेला. त्याला फडणवीस यांनीही प्रतिसाद दिला. या उभयतांमध्ये काही मिनिटे चर्चा झाली आणि राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय ठरला. यावेळी प्रचंड गर्दी झाली होती.

मुख्यमंत्री ठाकरे यांचा पूरग्रस्त पाहणीसाठी कोल्हापूर दौरा निश्चित झाला. त्याचवेळी पूर्वनियोजित दौर्‍यानुसार देवेंद्र फडणवीसही कोल्हापूर दौर्‍यावर होते. फडणवीस हे शाहूपुरी कुंभार गल्लीत पूरग्रस्त भागाची पाहणी करीत होते. त्याचवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्या ठिकाणी पोहोचत होते. फडणवीस याच भागात आहेत याची माहिती मिळताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांनी त्यांना फोन केला आणि आपण जेथे आहात, त्याच ठिकाणी मुख्यमंत्री येत आहेत. वेगवेगळी पाहणी नको, आपण एकत्र पाहणी करू, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचा निरोप त्यांनी दिला. यावेळी मुख्यमंत्र्यांसमवेत पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, राजेश क्षीरसागर हेही होते.

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत देवेंद्र फडणवीस या ठिकाणी थांबले. त्यांच्या सोबत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेही होते.

प्रचंड गर्दी

आजी-माजी मुख्यमंत्री समोरासमोर येताच प्रचंड गर्दी झाली. याच गर्दीत शिवसैनिकांनी ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’ अशा घोषणा देत वातावरण दणाणून सोडले.

कानगोष्टी

ठाकरे व फडणवीस यांच्यात काही मिनिटे चर्चा झाली. याचवेळी फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानात काही गोष्टी सांगितल्या आणि आपल्या पुढील दौर्‍यासाठी फडणवीस मार्गस्थ झाले.

दरम्यान, प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांचा फोन देवेंद्र फडणवीस यांना आला होता, असे सांगून ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. फडणवीस यांनी थांबून त्यांच्याशी चर्चा केल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

चर्चा बंद दाराआड नाही ः उद्धव

या चर्चेविषयी पत्रकारांनी विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की, होय. दोघांत चर्चा झाली. ही चर्चा बंद दाराआड झाली नाही तर उघड्यावर झाली. घराघरांत पाणी शिरल्यामुळे दारंच नाहीत, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत जी बैठक होईल, त्यामध्ये विरोधी पक्षांच्या सूचनांचे स्वागत करू, असे सांगितले.

बैठकीत मुद्दे मांडणार ः फडणवीस

या भेटीविषयी फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की, एवढ्या कमी चर्चेत काही आश्वासन होऊ शकत नाही. तातडीची मदत देणे आणि कायमस्वरूपी उपाययोजना करणे हे दोन मुद्दे आहेत. मुख्यमंत्र्यांनी बैठकीचा प्रस्ताव ठेवला असून आम्ही या बैठकीला जाऊ. त्यावेळी आमच्या ज्या काही सूचना आहेत, त्या निश्चितपणे मांडणार आहोत.

Back to top button