कोल्हापूर : अनियमितता आढळल्यास शिवभोजन केंद्र होणार बंद | पुढारी

कोल्हापूर : अनियमितता आढळल्यास शिवभोजन केंद्र होणार बंद

कोल्हापूर : अनिल देशमुख

शिवभोजन केंद्रांवर अनियमितता आढळल्यास ते केंद्र आता बंद होणार आहे. या अनियमितता तपासण्यासाठी पथके तयार करा आणि कारवाई करा, असे आदेश राज्य शासनाने पुरवठा विभागाला दिले आहेत. गरजू आणि गरिबांना दहा रुपयांत पोटभर भोजनासाठी राज्य शासनाने शिवभोजन थाळी ही योजना सुरू केली आहे. त्याला राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मात्र, या योजना राबविणार्‍या काही केंद्रांत गैरप्रकारही होत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर शिवभोजन केंद्रांवर सीसीटीव्ही बसवणे सक्तीचे करण्यात आले आहे.

शिवभोजन थाळी आणि केंद्रांच्या तपासणीसाठी आता पथके तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या पथकांकडून नियमित आणि अचानक तपासणी करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. मंजूर केलेली पण अद्याप सुरू न झालेल्या केंद्रांना नोटिसा बजावून ती रद्द करण्याचेही आदेश दिले आहेत. यासह केंद्रांवर अनियमतता आढळल्यास कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत.या अनियमिततेमुळे होणार कारवाई

  • सौम्य अनियमितता : केंद्र वेळेत सुरू न करणे, फलक न लावणे, अभिप्राय नोंदवही न ठेवणे, पुरेशी स्वच्छता नसणे.
    केंद्र बंद करणार : कारणे दाखवा नोटीस, अशा बाबी दुबार आढळल्यास दंड आकारणी. त्यानंतरही सुधारणा न झाल्यास केंद्र बंद करणार.
  • गंभीर अनियमितता : पूर्व कल्पना न देता केंद्र बंद ठेवणे, निकषाप्रमाणे भोजन न देणे, सीसीटीव्ही सुरू नसणे, त्याचा डेटा उपलब्ध न करून देणे.
  • दंडात्मक कारवाई : किमान एक दिवसाची प्रतिदिन थाळी संख्येची पूर्ण रक्कम किंवा पाच हजार रुपये यापैकी जास्त असेल ती रक्कम दंड म्हणून आकारणार. ती अनियमितता पुन्हा आढळल्यास केंद्र बंद करणार.
  • अतिगंभीर अनियमितता : शिळे अथवा निकृष्ट दर्जाचे भोजन देणे, दुबार फोटो अपलोड करणे, शिवभोजन केंद्र अन्य व्यक्तीमार्फत चालविणे.
  • केंद्राची मंजुरी रद्द : शिवभोजन केंद्र तत्काळ निलंबित करून सदर केंद्राची मंजुरी रद्द करण्याची कारवाई.

Back to top button