

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत पदयात्रा, कोपरा सभांसह कॉफी आणि चाय पे चर्चा अशा विविध माध्यमांतून रविवारी शहरात प्रचाराचा धुरळा उडाला. रविवारची सुट्टी आणि स्वामी समर्थ प्रकट दिन असा दुहेरी योग साधत दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांनी मतदारांशी संवाद साधला.
या निवडणुकीत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना सुरू आहे. भाजपचे उमेदवार सत्यजित कदम आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारास वेग आला आहे. दोन्ही उमेदवारांच्या प्रचारार्थ भाजप आणि महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. सकाळच्या 'चाय पे चर्चा' कार्यक्रमापासून ते रात्री कोपरा सभांपर्यंत नेत्यांसह कार्यकर्त्यांनी पायला भिंगरी बांधली. सकाळीच फोनाफोनीद्वारे प्रचार यंत्रणा सक्रिय करीत नेतेमंडळी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवत आहेत.
रविवारी शासकीय सुट्टी आणि स्वामी समर्थ प्रकट दिन असा योग आला. त्यामुळे दोन्ही उमेदवारांच्या नेत्यांनी स्वामी समर्थ मंदिरांत हजेरी लावून प्रचाराची संधी साधली. त्यामुळे शहरातील अनेक स्वामी समर्थ मंदिरांत भाविकांसह नेते, कार्यकर्त्यांची मांदियाळी होती. रविवारच्या सुट्टीमुळे कुटुंबातील बहुतांश सदस्य एकत्र असल्याने उमेदवार, कार्यकर्त्यांनी प्रचारात घरभेटीवर अधिक भर दिला. विविध भागांत पदयात्रांद्वारे मतदारांना आपल्या उमेदवारास विजयी करण्याचे आवाहन केले. या निवडणुकीसाठी आपण कसे सक्षम आहोत आणि विरोधक कसा अकार्यक्षम आहे, याची कोपरा सभांतून उमेदवार मांडणी करीत आहेत. पदयात्रा, कोपरा सभा आणि घरभेटी अशा विविध माध्यमांतून मतदारांना प्रभावित केले जात आहे.
दोन्ही पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रिक्षातून पारंपरिक पद्धतीने नियोजन सुरू आहे. रिक्षावर ध्वनिक्षेपक बसवून उमेदवार आणि पक्षाच्या कार्याचा आढावा मांडला जात आहे. डिजिटल प्रचाराबरोबरच पारपंरिक प्रचार पद्धतीचा वापर सुरू आहे.
पदयात्रा सुरू होताच प्रत्येक कार्यकर्ता आपल्या भागात पदयात्रा यावी यासाठी धडपड करीत आहे. त्यामुळे पदयात्रांचा नियोजित मार्गापेक्षा अधिक प्रवास होत असल्याने नेत्यांसह कार्यकर्त्यांचीही चांगलीच दमछाक होत आहे.