भाव, भक्तिगीतांच्या नजराण्यातून चैत्रपालवी बहरली | पुढारी

भाव, भक्तिगीतांच्या नजराण्यातून चैत्रपालवी बहरली

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : ‘इंद्रायणीकाठी देवाची आळंदी…’, ‘देवाचिये दारी उभा क्षणभरी…’, ‘अरे कृष्णा अरे कान्हा ’, ‘सत्वर पाव गं मला भवानी आई…’ अशा भाव, भक्तिगीतांचा सुमधूर नजराणा करवीरकरांनी अनुभवला. गीत- संगीताच्या या सांगितिक मैफलीने गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला जणू चैत्रपालवी बहरली. निमित्त होते दै. ‘पुढारी’ आयोजित आणि ग्रोबझ प्रायोजित ‘चैत्रपालवी’ कार्यक्रमाचे. केशवराव भोसले नाट्यगृहात गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या कार्यक्रमाला रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली.

दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी दै. ‘पुढारी’चे साहाय्यक सरव्यवस्थापक राजेंद्र मांडवकर , ग्रोबझ इंडिया अर्बन निधी लि. चे ब—ँड शेप अ‍ॅड एजन्सी आणि डायरेक्टर अमरसिंह भोसले, रवी सागर हळवणकर, चेअरमन वैशाली कोळी आदी मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी रवी सागर हळवणकर यांनी गुढीपाडव्याच्या रसिकांना शुभेच्छा देत या मैफिलीने खर्‍या अर्थाने नववर्षाचे स्वागत होत असल्याचे सांगितले. संस्थेबाबत बोलताना ते म्हणाले, दोन वर्षांपूर्वी रोपटे असलेली संस्थेची यशस्वी वाटचाल सुरू आहे. डिजिटल कनेक्टिव्हिटीतही पुढचे पाऊल टाकत असूून संस्थेच्या एनईएफटी, आरटीजीएस, आयएमपीएससारख्या सर्व ऑनलाईन बँकिंग सेवा उपलब्ध असून गुढीपाडव्यापासून एटीएम सेवा सुरू होणार आहे. पुढील वर्षात एक लाख ग्राहक संस्थेशी जोडण्याचा संकल्प असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘लिटल चॅम्प’ फेम कार्तिकी आणि ‘गौरव महाराष्ट्राचा’ महाविजेता कौस्तुभ गायकवाड यांनी भावगीत, भक्तिगीतांसोबतच मराठी व हिंदी चित्रपटांतील गीते सादर करून आपल्या आवाजातील स्वरविस्ताराचा अनुभव रसिकांना दिला. त्यांची सुरेल मैफल प्रेक्षक देहाचे कान करून ऐकत असतानाच त्यांना टाळ्यांच्या गजरात दादही देत होते. सोहम जगताप याने संतूर वादनाचे सादरीकरण करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांना संगीतसाथ सचिन जगताप, त्यांच्या सहकारी वाद्यवृंदाने दिली. ‘वसंताची, उमेद नव्या चैतन्याची, गुढी उभारू मांगल्याची, प्रयत्नांची अन् प्रेमाची’ असा संदेश घेऊन येणार्‍या गुढीपाडवा सणाचा आनंद कार्यक्रमातून द्विगुणीत झाल्याच्या भावना रसिकांनी व्यक्त केल्या.

Back to top button