इंधन दरवाढीला लगाम कधी?

File Photo
File Photo

कोल्हापूर; सचिन टिपकुर्ले : पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅसच्या दरवाढीने सरकारने ग्राहकांच्या खिशावरच डल्ला मारला आहे. युक्रेन-रशिया युद्धाचे कारण सांगून प्रत्येक वस्तूचे दर वाढवले जात आहेत. इंधनाच्या सतत वाढणार्‍या दरावर लगाम घालण्याची गरज आहे. केंद्र व राज्य शासनाने किमान व्हॅट कमी केला तरी इंधनाच्या किमती काही प्रमाणात स्थिर होतील, पण सरकारची तशी मानसिकता तयार करण्यासाठी जनरेट्याची गरज आहे.

कोरोना काळात इंधनाचा वापर जगभर कमी झाला होता. मागणी कमी झाल्याने कच्च्या तेलाच्या किमतीही कमी झाल्या होत्या. भारतात तेव्हा इंधनाचे दर स्थिर होते.कोरोनाची लाट ओसरू लागल्याने जनजीवन पूर्वपदावर आले. सर्व काही स्थिरस्थावर होत असतानाच रशिया-युक्रेन युद्धाची भर पडली आणि कच्च्या तेलाच्या किमती वाढू लागल्या. देशातील चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा विचार करून केंद्राने दरवाढीवर नियंत्रण आणले होते, पण निकाल जाहीर होताच इंधन दरवाढ सुरू झाली.पेट्रोलियम कंपन्या कोणत्याही स्थितीत तोटा सहन करायला तयार नाहीत. इंधनाचे दर रोज काही पैशांनी वाढत आहेत.

युद्धजन्य परिस्थिती कायम राहिली तर रोज इंधन वाढणार का, असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. बेलगामपणे वाढणार्‍या इंधन दराला केंद्र व राज्य सरकारने लगाम लावण्याची गरज आहे.

पेट्रोल                    डिझेल
मूळ किंमत         मूळ किंमत
81.80                   77.20

राज्य सरकार व्हॅट
20.45                 16.22

व्हॅट सेस
10.12                 3.00

वितरक कमिशन
3.51                   2.26

एकूण
115.88              98.68

डिझेल गाठणार शंभरी

पेट्रोल-डिझेलमध्ये बुधवारी पुन्हा वाढ झाली. पेट्रोल दरात प्रति लिटर 84 पैसे व डिझेल दरात 83 पैशांची वाढ झाली आहे. कोल्हापुरात पेट्रोलचा दर 115 रुपये 64 पैसे तर डिझेल दर 98 रुपये 45 पैसे झाला आहे. गेल्या नऊ दिवसांत पेट्रोल-डिझेलमध्ये सहा रुपयांची वाढ झाली असून जनता दरवाढीने हैराण झाली आहे.

कोल्हापुरात पेट्रोल 115 रुपये 64 पैसे तर डिझेल 98 रुपये 45 पैसे प्रति लिटर झाले आहे. डिझेलची दिवसेंदिवस होणारी दरवाढीची गती पाहता लवकरच डिझेल शंभरी गाठण्याची शक्यता आहे. गेल्या आठ दिवसांत पेट्रोल व डिझेल दरात प्रत्येकी सहा रुपयांची वाढ झाली आहे.शहरातील अनेक पेट्रोल पंपावर दरात तफावत अढळून येत आहे. त्यामुळे काही ठिकाणी वाहन चालक व पंपावरील कामगारांमध्ये वादाचे प्रसंग घडत आहेत.

कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने इंधन दरात सतत वाढ होत चालली आहे. गेल्या 22 मार्चपासून पेट्रोल-डिझेल दरात सतत वाढ होत चालली आहे. दि. 22 मार्च रोजी पेट्रोलचा 110 रुपये प्रति लिटर असणारा दर 29 मार्च रोजी 115 रुपये झाला आहे. डिझेलचा दर 93 रुपये 49 पैसे हेाता तो 97 रुपये 62 पैसे झाला आहे. डिझेल दरात सतत वाढ होणारी वाढ ही महागाईला निमंत्रण देणारी ठरत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news