कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक : आखाडा उत्तरचा; शड्डू कागलचा | पुढारी

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक : आखाडा उत्तरचा; शड्डू कागलचा

कोल्हापूर; चंद्रशेखर माताडे : ‘कोल्हापूर उत्तर’ची पोटनिवडणूक होत आहे. उन्हाचा पारा वाढेल तसा प्रचाराचा जोरही वाढत आहे. मात्र या उत्तरच्या मैदानात कागलचे शड्डू घुमत आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवार (कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक) म्हणून काँग्रेसच्या जयश्री जाधव यांच्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे नेते प्रचारात उतरले आहेत. तसेच भाजप उमेदवार सत्यजित कदम यांच्यासाठी भाजप नेते प्रचार करत आहेत. मात्र निवडणूक ‘उत्तर’ची असली तरी ‘कागल’च्या उखाळ्या-पाखाळ्या काढल्या जात आहेत.

महाविकास आघाडीचे (कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक) नेते म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ प्रचारात आहेत; तर भाजपकडून जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनीही प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच मेळाव्यातून ते भाजपचा प्रचार करत आहेत. मात्र त्यांच्या प्रचारात कागलचे मुद्दे उपस्थित होत असल्याने त्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

नवाब मलिक (कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक) यांच्या अटकेवरून राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभर निदर्शने केली तशी ती कागल येथेही झाली. तोच आता प्रचाराच मुद्दा बनला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपचे कार्यकर्ते प्रचाराला येणार असे म्हटले होते. त्यावर बोलताना हसन मुश्रीफ यांनी भाजपचा बाहेरून कार्यकर्ते आणण्याचा हा प्रकार म्हणजे कोल्हापूरचा अपमान आहे. कोल्हापूरची अस्मिता डिवचण्याचा प्रकार असल्याचे म्हटले होते. त्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून समरजितसिंह घाटगे यांनी टीका करताना नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर याबाबत कागलच्या गैबी चौक ते राम मंदिरमार्गे छत्रपती शिवरायांचा पुतळा अशी मिरवणूक काढली होती. तेव्हा कोल्हापूरचा अपमान झाला नव्हता का, असा सवाल केला आहे. न्यायालयाच्या आदेशाने मलिक हे तुरुंगात असल्याची आठवण घाटगे यांनी करून दिली आहे.

तसेच मातोश्री संस्थेवरूनही त्यांनी मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला आहे. निवडणुकीच्या तोंडावर काढलेल्या या संस्थेतून किती महिलांना त्यांनी स्वावलंबी केेले, असा सवाल करीत मुश्रीफ यांच्यावरील टीकेला बत्ती दिली आहे.

त्यामुळे कोल्हापूर उत्तरच्या निवडणूक आखाड्यात कागलचा शड्डू घुमता असल्याची चर्चा आहे. आता मुश्रीफ याला काय उत्तर देणार याकडे लक्ष लागले आहेत.

Back to top button