बेकायदा गर्भलिंग निदान प्रकरणी हुपरीतील महिलेसह ३ एजंट जेरबंद | पुढारी

बेकायदा गर्भलिंग निदान प्रकरणी हुपरीतील महिलेसह ३ एजंट जेरबंद

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : परिते (ता. करवीर) येथील बेकायदा गर्भलिंग निदान सेंटरप्रकरणी करवीर पोलिसांनी हुपरी (ता. हातकणंगले) येथील वयोवृद्ध महिलेसह तीन एजंटांना अटक केली. संशयितांना पोलिस कोठडी मिळाली आहे.

बेकायदा गर्भलिंग निदान प्रकरणी राजमती यशवंत माळी (वय 63), दीपक केरबा शेंडे (35, रा. दारवाड, भुदरगड), गणेश साताप्पा डवरी (33, घोटवडे, राधानगरी), रणजित महादेव मुडे – पाटील (35, रा. बर्गेवाडी, ता. राधानगरी) आदींना जेरबंद केले आहे. गर्भलिंग तपासणी केलेल्या 19 महिलांचीही चौकशी झाली. यामध्ये आणखी काही एजंटाची नावे निष्पन्‍न झाली आहेत.

गर्भलिंग निदान सेंटरवर 19 जुलैला छापा टाकून पोलिसांनी महेश पाटील, राणी कांबळेसह 6 जणांना अटक केली होती. सोनोग्राफी मशिन, गर्भलिंग तपासणी झालेल्या महिलांच्या नावाच्या नोंदी असलेल्या दोन डायर्‍या, वैद्यकीय उपकरणे, औषधसाठा हस्तगत करण्यात आला होता. महेश पाटील, राणी कांबळे हिच्या चौकशीतून राधानगरी व भुदरगड तालुक्यातील एजंटांची नावे निष्पन्न झाली.

त्यात दीपक शेंडे, गणेश डवरी, रणजित मुडे-पाटील याचा समावेश होता. हुपरीतील राजमती माळीसह चौघांना अटक करण्यात आली. गर्भलिंग निदान सेंटरप्रकरणी अटक केलेल्यांची संख्या दहा झाली आहे. आणखी काही एजंटांना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांनी सांगितले.

अटक केलेले तीनही एजंट आठ, दहा महिन्यांपासून सक्रिय होते. घसघशीत मिळणार्‍या कमिशनमुळे एजंटांचा मिळकतीचा गोरखधंदा सुरू होता.

गर्भलिंग निदान सेंटरमध्ये तपासणी केल्याप्रकरणी आतापर्यंत 19 महिलांसह त्यांच्या पतीचे जबाब घेतले आहेत. बेकायदा तपासणीप्रकरणी संबंधितांवर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याचेही सांगण्यात आले.

Back to top button