सीपीआर मध्ये म्युकर मायकोसिससह मेंदूची शस्त्रक्रिया यशस्वी | पुढारी

सीपीआर मध्ये म्युकर मायकोसिससह मेंदूची शस्त्रक्रिया यशस्वी

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : सीपीआर नेहमीच गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेत अव्वल आहे. 55 वर्षांच्या व्यक्‍तीवर येथील वैद्यकीय पथकाने म्युकर मायकोसिस आणि ब्रेन अ‍ॅबसेस (मेंदूमधील ‘पस’ ची गाठ) ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करून रुग्णाला जीवदान देण्यात यश आले आहे. संबंधित रुग्णांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याची माहिती सीपीआर प्रशासनाने दिली.

चेहर्‍याची उजवी बाजू दुखणे, डोळे दुखणे, उजवा डोळा बंद होत नव्हता, चेहर्‍याला आलेले व्यंग या समस्या घेऊन 11 जुलै रोजी रुग्ण सीपीआरमध्ये दाखल झाला. कान-नाक-घसा विभागप्रमुख डॉ. अजित लोकरे, डॉ. तिवारी यांनी संबंधित रुग्णांवर उपचार सुरू केले.

रुग्णाच्या मेंदू व सायनसेस आणि डोळ्याचा एम.आर.आय, सीटी स्कॅन केला असता चेहर्‍याच्या हाडांमधील हवेच्या पोकळ्या म्हणजेच सायनसेसमध्ये म्युकर मायकोसिस असल्याचे निष्पन्‍न झाले.

तर मेंदूच्या उजव्या भागात अ‍ॅबसेस (‘पस’ची गाठ) आढळली. वैद्यकीय तज्ज्ञांनी प्रथम मेंदूची शस्त्रक्रिया करून ‘पस’ ची गाठ काढली. त्यानंतर म्युकर मायकोसिसची शस्त्रक्रिया केली.

वैद्यकीय पथकात डॉ. वासंती पाटील, डॉ. स्नेहल सोनार, डॉ. सामानगडकर, डॉ. दिलीप वाडकर, ज्येष्ठ भूलतज्ज्ञ डॉ. उल्हास मिसाळ, डॉ. मारुती पोवार यांनी विशेष परिश्रम घेतले. तर अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.

Back to top button