कोल्हापूर : महापुरात मुक्या जीवांनाही रुग्णवाहिकेचा आधार | पुढारी

कोल्हापूर : महापुरात मुक्या जीवांनाही रुग्णवाहिकेचा आधार

कोल्हापूर ; डी. बी. चव्हाण : महापुराचे अक्राळ-विक्राळ रूप, सर्वत्र पाणीच पाणी, यातून माणसांना वाचवायचे कसे, असा प्रश्‍न निर्माण झाला असताना बिचार्‍या मुक्या जीवांच्या आरोग्याची काळजी कोण आणि कशी घेणार? पशुवैद्यकीय अधिकारी कुठून उपलब्ध होणार? असे अनेक प्रश्‍न होते. या गंभीर परिस्थितीत पशुपालक शेतकर्‍यांना आधार ठरली ती शासनाच्या पशुवैद्यकीय विभागाची रुग्णवाहिका सेवा.

पशुवैद्यकीय विभागाच्या 4 रुग्णवाहिकांमधील डॉक्टरांच्या पथकाने मुसळधार पावसातही जनावरांना आरोग्यसेवा देऊन त्यांचे प्राण वाचवले. राज्य शासनाच्या मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेंतर्गत शासनाने कोल्हापूर जिल्ह्यासाठी 4 रुग्णवाहिका दिल्या आहेत. महापुराच्या कालावधीत जिल्ह्यातील जवळपास दोन हजारांहून अधिक जनावरांवर जागेवर जाऊन उपचार करून अनेकांचे प्राण वाचवले.

कागल परिसर 50, हातकणंगले परिसरातील छावणीमध्ये 273 उपचार, 285 लसीकरण, कोडोली अंतर्गत भागात 127 उपचार, 100 लसीकरण, जयसिंगपूर परिसरातील 568 जनावरांवर उपचार केले.

आरोग्य विभागाच्या रुग्णवाहिकेसाठी जसा 108 टोल फ्री क्रमांक आहे, तसा पशुसंवर्धनाच्या या रुग्णवाहिकेसाठी 1962 असा टोल फ्री क्रमांक असून पशुपालकांनी या नंबरवर संपर्क साधला.

रुग्णवाहिकेत शस्त्रक्रियेची सोय

या रुग्णवाहिकेत लहान जनावरे उदा. कुत्रे, मांजर, मोर यांसह लहान जंगली प्राणी, पाळीव लहान प्राणी यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याची सुविधा आहे.

फोन आला की पथक तत्काळ रवाना

जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा उपायुक्‍त डॉ. वाय. डी. पठाण यांनी नियोजन केले होते. तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक ज्या त्या भागात आणि कोल्हापुर मधील चिकित्सालयात सज्ज ठेवले होते. फोनवरून मागणी आली की, हे पथक त्या भागात जात असे.

Back to top button