कोल्हापूर; पुढारी ऑनलाईन : काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाने कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. आज भाजपकडून सत्यजित कदम आणि महाविकास आघाडीकडून जयश्री कदम यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावेळी गृह राज्य मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. या टीकेला सतेज पाटील यांनी प्रत्युत्तर देत २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या सोबत राहून शिवसेनेच्या पाठित दादांनी खंजीर कसा खुपसला हे अख्ख्या जिल्ह्यानं पाहिलं आहे असा हल्ला चढवला.
सतेज पाटील पुढे म्हणाले की, निवडणूक लादून चूक झाल्याचे लक्षात येताच त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. शिवसेना उमेदवार पाडण्यासाठी अपक्ष उमेदवार उभे केले गेले, ते कशा पद्धतीने उभे केले हे सगळ्या शिवसेना उमेदवारांना माहीत आहे. ज्या शिवसेनेच्या जीवावर भाजप मोठी झाली त्यांना आता कोणत्या परिस्थितीतून जावं लागत हे महाराष्ट्र पाहत आहे. त्यामुळे शिवसेना खोट्या आरोपांना फसणार नाही याची खात्री आहे.
चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या आरोपांवर बिंदू चौकात एकाच माईकवर चर्चा करण्यास तयार असल्याचे प्रतिआव्हानही त्यांनी दिले. पाच काय ५० वर्षांचा लेखाजोखा मांडू असे त्यांनी सांगितले. कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक उत्साहात लढण्याची नसून काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांचे दुर्दैवी निधन झाल्याने ही पोटनिवडणूक होत आहे. या गोष्टींचा विचार न करता भाजप आनंदोत्सव करत निवडणूक लढत असून महाराष्ट्राच्या परंपरेला हे साजेसे नसल्याची टीका त्यांनी केली.
माझ्या विरोधकांनी १६ महिन्यांपूर्वीची माझी क्लिप शोधून काढली. वारंवार हे कोल्हापुरातून निवडून येऊ शकलो नाहीत म्हणून पुण्याला पळाले होते, यावर मी म्हटलं हो…कोल्हापूर जिल्ह्यातील एकातरी आमदाराने राजीनामा द्यावा. आपली जागा मोकळी करुन द्यावी. मी पोटनिवडणूक लढवतो. त्यानंतर कोण विजयी होतो ते बघुया. जर विजयी नाही झालो तर हिमालयात जाईन असं मी म्हटलो होतो. पण तुम्ही पण (बंटी पाटील यांनी) असं म्हटलं होतं, की या शहराला थेट शुद्ध पाणी मिळालं नाही तर विधानसभा लढवणार नाही. त्यांनी आता जनतेला जाब द्यावा की थेट पाईपलाईनंच पाणी कुठे आहे. आमदार झालात, मंत्री झालात." असे म्हणत पाटील यांनी जोरदार टीका केली.