पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पंचगंगेच्या (Panchganga river) पाणी पातळीत वाढ सुरूच आहे. आज (दि. १४) संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पंचगंगा नदीची पाणी पातळी ३७.४ फुटांवर (पंचगंगा नदी इशारा पातळी – ३९ फूट व धोका पातळी – ४३ फूट आहे) पोहचली. त्यामुळे जिल्ह्यातील एकुण ५९ बंधारे पाण्याखाली गेले आहेत, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे.
दरम्यान, आज दुपारी तीन वाजेपर्यंत कोल्हापूमधील बारा नदींवरील एकुण ५९ बंधारे पाण्याखाली गेले. राजाराम बंधारा पाणी पातळी ३७ फूट २ इंच इतकी होती. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत आणखी दोन इंचांची वाढ झाली.
पंचगंगेची इशारा पातळी ३९ फूट असून सध्या पाणी पातळी ३७.४ फुटांवर आहे. पंचगंगा नदीची धोका पातळी ४३ फूट आहे. राधानगरी धरणातून १४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कासारी मध्यम प्रकल्प धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे धरण पाणीसाठ्यात वाढ होत आहे. धरणाच्या सांडव्यातून व विद्युत विमोचकाद्वारे नदी पात्रात विसर्ग सुरू करण्यात येत आहे. कासारी नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा व सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्हा प्रशासन 'अॅक्शन मोड'मध्ये आले असून, जिल्हाधिकारी राहुल रेखावार संभाव्य पूरबाधित परिसराची पाहणी केली. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत हेलिपॅडसाठी जागा निश्चित करण्यात आल्या असून, स्थानिक रेस्क्यू फोर्ससह संबंधितांना सज्ज राहण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
०२३१-२६५९२३२
०२३१-२६५२९५०
०२३१-२६५२९५३
०२३१-२६५२९५४
टोल फ्री क्र. १०७७
जिल्हा नियंत्रण कक्ष 24 तास सुरु