कोल्हापूर; चंद्रशेखर माताडे : कोल्हापूर (Kolhapur North Election) उत्तरच्या पोटनिवडणुकीवरून महाविकास आघाडीत नाराजीनाट्य रंगले. कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला गेलेला तडा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत वाढणार अशी चिन्हे दिसत असतानाच या वादावर पडदा पडला आहे. पण यानिमित्ताने 2024 च्या तयारीची चर्चा सुरू झाली आहे.
शिवसेनेला हा मतदारसंघ कायमचा गमवायचा नाही तर काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीला हा मतदारसंघ सोडायचा नाही. भाजपला या मतदारसंघावर आपले वर्चस्व हवे आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीच्या माध्यमातून 2024 ची तयारी केली जात आहे.
यापूर्वीच्या निवडणुकांचे चित्र पाहिले तर 1972 पासून आतापर्यंत झालेल्या 11 विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने 5 वेळा विजय मिळविला आहे. तर काँग्रेसने 3 वेळा विजय मिळविला आहे. 2 वेळा शेतकरी कामगार पक्ष व एकदा जनता पक्षाने विजय मिळविला आहे. भाजपला या मतदारसंघावर आपले नाव कोरता आलेले नाही.
मात्र गेल्यावेळी 2019 मध्ये या मतदारसंघातून शिवसेनेचा पराभव करून काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत जाधव विजयी झाले. त्यांच्या अकाली निधनाने होत असलेल्या या पोटनिवडणुकीत शिवसेनेने आपला दावा सांगितला. मात्र महाविकास आघाडीचा जो फॉर्म्युला ठरला, त्यामध्ये शिवसेनेचा हा दावा बसत नसल्याचे काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते वारंवार सांगत होते. मात्र महाविकास आघाडीत ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसारच निर्णय झाला आणि तो तसाच होणार हे सुरुवातीपासून स्पष्ट होते तरी मग जे काही घडले ते कशासाठी? तर हे सगळे सुरू आहे ते 2024 च्या निवडणुकीसाठी. (Kolhapur North Election)