कोल्हापूर, सांगलीला पूर संरक्षक भिंत आवश्यक | पुढारी

कोल्हापूर, सांगलीला पूर संरक्षक भिंत आवश्यक

कोल्हापूर ; सुनील कदम : गेल्या काही वर्षांत सातत्याने महापुराच्या अस्मानी आपत्तीला तोंड देत असलेल्या कोल्हापूर आणि सांगली शहराला पंचगंगा आणि कृष्णा नदीकाठी संरक्षक भिंती बांधून सुरक्षित करण्याची गरज आहे. महापुराच्या धास्तीने शेकडो वर्षांपासून असलेली नागरी वस्ती स्थलांतरित करणे हा त्यावरचा उपाय होऊ शकत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर आणि सांगलीत पूर संरक्षक भिंती बांधण्यासाठी भरीव मदत देण्याची गरज आहे.

कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांना महापुराच्या आणि समुद्रातील भरती-ओहोटीच्या पाण्यापासून संरक्षित करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच या भागात संरक्षित भिंती बांधण्याची योजना जाहीर केली आहे. त्यानुसार या पाच जिल्ह्यांमध्ये 171 किलोमीटर लांबीच्या संरक्षित भिंती बांधण्यात येणार असून, मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी 1,600 कोटी रुपये मंजूर केले आहेत.

अशाच पद्धतीने कोल्हापुरात पंचगंगा आणि सांगलीत वारणा नदीकाठी संरक्षित भिंती बांधण्याची गरज आहे. कारण, मागील काही वर्षांपासून सांगली, कोल्हापूरला महापुराचा धोका वाढलेला दिसत असून, दरवर्षी हजारो कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. महापुराच्या वेढ्यामुळे ही दोन शहरे जणू काही उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे कोकणातील नदीकाठच्या शहरांप्रमाणेच ही दोन मोठी आणि समृद्ध शहरेही महापुरापासून संरक्षित करण्याची आवश्यकता आहे.

कोल्हापूर शहरालगत असलेल्या पंचगंगा नदीच्या दोन्ही बाजूस असलेल्या पूररेषेवर पूर संरक्षक भिंत उभारल्यास कोल्हापूर शहरासह अनेक उपनगरे आणि नदीकाठच्या नागरी वस्त्या संरक्षित होऊ शकतात. तशाच पद्धतीने सांगली शहरालगत कृष्णा नदीच्या दोन्ही किनारी पूर संरक्षक भिंती उभारल्यास सांगली आणि मिरज ही दोन्ही शहरे सुरक्षित होऊ शकतात.

कोल्हापूर शहरालगतच्या नदीकाठाची लांबी दहा ते बारा किलोमीटर आहे. कोकणातील पूर संरक्षक भिंतींच्या खर्चाचा निकष निश्‍चित धरल्यास कोल्हापुरातील संरक्षक भिंतींसाठी जवळपास 70 ते 150 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सांगली, मिरजेत नदीकाठाची लांबी साधारणत: दहा-बारा किलोमीटरच आहे.

त्यामुळे इथल्या पूर संरक्षक भिंतींसाठीही 70 ते 150 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. म्हणजे साधारणत: 300 ते 400 कोटी रुपयांच्या खर्चात ही दोन्ही शहरे महापुरापासून संरक्षित होऊ शकतात.

प्रत्येक महापुरात या दोन शहरांचे प्रत्येकी दोन-चार हजार कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. महापुरामुळे या दोन शहरांचे होणारे प्रचंड नुकसान विचारात घेता या दोन शहरांना संरक्षित करण्यासाठी तीन-चारशे कोटी रुपयांच्या पूर संरक्षक भिंतींचा खर्च काही फार मोठा नाही. त्यामुळे या दोन शहरांना महापुरापासून संरक्षित करण्यासाठी पूर संरक्षक भिंत बांधायला अग्रक्रम देण्याची आवश्यकता आहे.

महापुरापासून संरक्षण करण्यासाठी नदीकाठची नागरी वस्तीच अन्यत्र स्थलांतरित करणे हा उपाय नव्हे! कारण, कोल्हापूर-सांगलीतील नदीकाठावरील नागरी वस्ती ही आता वसलेली नाही, तर त्याला शेकडो वर्षांचा इतिहास आहे.

पुणे शहराच्या मध्यभागातून मुळा-मुठा नद्या वाहतात, म्हणून पुण्यातील नागरी वस्ती स्थलांतरित केलेली नाही, तर या नद्या पूर संरक्षक भिंती बांधून संरक्षित करण्यात आल्या आहेत.

मुंबईतील मिठी नदीही नागरी वस्तीतून वाहते म्हणून नदीकाठची नागरी वस्ती स्थलांतरित केलेली नाही, तर नदीकाठ संरक्षित करण्यात आला आहे. हाच न्याय कोल्हापूर आणि सांगलीलाही लावण्याची गरज आहे.

जगभरातील अनेक मोठी शहरे नदीकाठावरच वसलेली आहेत. तिथेही पूर आणि महापूर येतात; पण म्हणून तिथल्या नागरी वस्त्या स्थलांतरित न करता पूर संरक्षक भिंती बांधून नागरी वस्त्या संरक्षित करण्यात आलेल्या आहेत. तसाच दिलासा कोल्हापूर-सांगलीलाही देण्याची गरज आहे.

तसेच कोल्हापूर शहरात असणार्‍या जयंती व दुधाळी नाल्यांमुळे शहरात महापुराचे पाणी शिरते. जर या नाल्यांना पूरसंरक्षक भिंती बांधल्यास महापुराचे पाणी सर्व शहरात पसरणार नाही. त्याचप्रमाणे कोल्हापुरातील काही सखल भागात महापुराचे पाणी येते व त्या भागाचा शहराशी संपर्क तुटतो. अशा काही ठिकाणी उड्डाणपूल बांधणे आवश्यक आहे. त्याचीही शासनाने दखल घेण्याची गरज आहे.

नदीकाठ ते समुद्रकाठ!

स्व. वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना मुंबईच्या अरबी समुद्रात भराव टाकून समुद्र हटवून नरीमन पॉईंटची निर्मिती करण्यात आली. मात्र, असे करण्याने कुठे समुद्र कोपून तो नरीमन पॉईंटमध्ये शिरल्याचे द‍ृष्टिक्षेपात नाही. मुंबईतील मिठी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात भराव घालून नागरी वस्ती वसविण्यात आली आहे.

या भागात उभारण्यात आलेला बीकेसी कॉम्प्लेक्स परिसर तर अख्ख्या मुंबईत सर्वात महागडा परिसर म्हणून ओळखला जातो. या परिसरालाही कधी महापुराने वेढा घातल्याचे दिसत नाही. कारण, इथला समुद्रकाठ आणि नदीकाठ आवश्यक त्या बांधकामांनी संरक्षित करण्यात आला आहे.

कोल्हापूर आणि सांगली शहरातही महापालिकेने नागरी वस्ती म्हणून निश्‍चित केलेल्या भागातच बांधकामे झालेली आहेत. त्यामुळे नदीकाठची नागरी वस्ती हटविण्याऐवजी पूर संरक्षक भिंत बांधून या शहरातील नागरी वस्ती आणि व्यापारी पेठ संरक्षित करण्याची गरज आहे.

इतिहासात डोकावण्याची गरज

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे निवासस्थान असलेला कोल्हापूरचा न्यू पॅलेस 144 वर्षांपूर्वी म्हणजे 1877 साली बांधण्यात आला आहे. सध्याचे जिल्हाधिकारी कार्यालयही इंग्रजांच्या काळात बांधण्यात आले आहे.

सांगलीचे गणपती मंदिर 1811 साली बांधण्यात आले. या प्रमुख इमारतींसह या भागातील नागरी वस्त्या जवळपास शंभर वर्षांतील पुराच्या पाण्याचा आढावा घेऊन अभ्यास करून वसविण्यात आल्या आहेत.

दीडशे वर्षांच्या कालावधीत कृष्णा-पंचगंगेला अनेकवेळा पूर आणि महापूर येऊन गेल्याची नोंद आहे. मात्र, या पुरांच्या कालावधीत कधीही न्यू पॅलेस अथवा गणपती मंदिरात पाणी शिरल्याची नोंद नाही.

या भागात शेकडो वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या हजारो घरांनासुद्धा कधी पुराने अथवा महापुराने ग्रासल्याच्या नोंदी आढळून येत नाहीत. मात्र, गेल्या काही वर्षांत हा भाग सातत्याने महापूरबाधित होत आहे. त्यामुळे या दोन्ही शहरांतील नदीकाठ आता पूर संरक्षित करण्याची गरज आहे.

Back to top button