कोल्हापूर : शिंगणापूर-हणमंतवाडी ला लागली महापुराची नजर | पुढारी

कोल्हापूर : शिंगणापूर-हणमंतवाडी ला लागली महापुराची नजर

कोल्हापूर ; गौरव डोंगरे : ग्रामीण जीवनाचा रांगडा बाज… उसाची शेती… कौलारू घरे आणि जुने वाडे असणारा शिंगणापूर, हणमंतवाडीचा परिसर जुन्या मराठी चित्रपटांमध्ये झळकला. 70-80 वर्षांपूर्वीची मातीची अनेक घरे आजही दिमाखात उभी आहेत; पण 2019 आणि यंदाच्या महापुरांची या गावांच्या वैभवाला नजर लागली. पुराच्या पाण्याने ही मातीची घरे ढासळत असून, यंदाही 25 ते 30 घरांचे मोठे नुकसान झाले आहे.

शिंगणापूर, हणमंतवाडी, नागदेववाडी ही गावे नदीकिनारीच वसलेली आहेत. 1989 च्या महापुरावेळी गावठाण भागात आलेल्या पुराच्या पाण्यामुळे येथील अनेकांचे नव्या वसाहतीत पुनर्वसन झाले. नवीन वसाहतीत अनेक कुटुंबांना जागा दिल्यानंतर त्यांनी घरे बांधली. मात्र, त्यानंतरही गावठाण भागात बांधकामे होत राहिली.

2005 आणि 2019 साली या भागाला पुन्हा महापुराची झळ पोहोचली. यंदाही महापुराची आतापर्यंतची सर्वाधिक पातळी नोंद झाली आहे.

गावठाण भागात नुकसान

हणमंतवाडीतील पोवार गल्‍ली, भट गल्‍ली, साळी गल्‍ली, पिंजरे गल्‍ली, चव्हाटा गल्‍ली, कचरे गल्‍ली, मदने गल्‍ली तर शिंगणापुरातील बैते गल्‍ली, पाटील गल्‍ली, चौगले गल्‍लीतील घरांना पुराचा मोठा फटका बसला आहे. 2019 पेक्षाही यंदा पाणीपातळी वाढल्याने येथील नुकसानीचे प्रमाण अधिक असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.

जुन्या घरांचे नुकसान

गावात पुराचे पाणी शिरलेल्या भागातील मातीच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक घरांच्या भिंती ढासळल्याने सर्व घरांना धोका पोहोचला आहे, तर हरिजन वसाहतीमधील अख्खे घरच कोसळल्याने या कुटुंबाच्या निवार्‍याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

शेती पाण्याखाली

गावातील बहुतांश ऊस शेती अद्याप पाण्याखालीच आहे. गावठाणमधील पाणी मागे सरकले असले तरी सर्व ऊसशेती पाण्याखालीच आहे. पिकांसोबतच कृषिपंप, जनावरांच्या गोठ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.

दहाजणांचे कुटुंब रस्त्यावर : बडेकर

आमचे 50 ते 60 वर्षे जुने चार खोल्यांचे कौलारू घर होते. पुराचे पाणी घरात शिरल्याने भिंती कोसळून छतही भुईसपाट झाले आहे. चार खोल्यांपैकी एकही खोली शिल्‍लक राहिलेली नाही. आता घराचे पुन्हा बांधकाम कसे करायचे आणि ते करेपर्यंत आमच्या कुटुंबाने कोठे राहायचे, हा प्रश्‍न आहे, असे प्रवीण बडेकर यांनी सांगितले.

भय इथले संपत नाही : शुभांगी पाटील

पुराच्या पाण्याने दुमजली घराची एक भिंत खचली आहे. त्याची तात्पुरती डागडुजी करणार आहोत. पण भिंतीचा मोठा भाग कोसळल्याने हे घरच आता धोकादायक बनल्यामुळे भय इथले संपत नाही, अशी अवस्था आमची झाल्याचे शुभांगी पाटील यांनी सांगितले.

Back to top button