कोल्हापूर : महामार्गावर महापुराची टांगती तलवार; पाच ब्लॅक स्पॉट | पुढारी

कोल्हापूर : महामार्गावर महापुराची टांगती तलवार; पाच ब्लॅक स्पॉट

कोल्हापूर : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गातील कागल ते किणी या अंतरात पाच ठिकाणी महापुराचे ब्लॅक स्पॉट असून पावसाळ्यापूर्वी याबाबत दक्षता न घेतल्याने यंदाच्या महापुरातही कोल्हापूरला महापुराचा फटका बसला. सहापदरीचा आराखडा तयार असूनही केवळ निविदा प्रक्रिया थंडावल्याने काम होऊ शकले नाही.

मयूर पेट्रोल पंप येथे पाणी येते. लिंगनूर थेथील नवीन बॉर्डर चेक पोस्ट येथे दोन ठिकाणी पाणी येते.उचगाव नाला पूल ते तावडे हॉटेल या परिसरात पाणी साचते. किणी बाह्यमार्ग ते किणी टोल नाका या ठिकाणी पुराचे पाणी येते. वारणा नदी व घुणकी नाल्याच्या महापुराची फूग आल्याने या ठिकाणी महामार्गावर पाणी आले होते.

पंचगंगा पूल ते सांगली फाटा येथे पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात येते. या महापुराच्या ब्लॅक स्पॉटमुळे यंदाही महामार्गावर पाणी आल्याने महामार्ग चार दिवस बंद होता.

2019मधील महापुराच्या पार्श्‍वभूमीवर सहापदरीचा नवीन डीपीआर बनविला आहे. पेठ ते शेंद्रे हा 67 कि.मी.चा 1895 कोटी रुपयांचा पहिला प्रस्ताव असून कागल ते पेठ हा 63 कि.मी.चा 1502 कोटी रुपयांचा प्रस्ताव आहे. एकूण 3397 कोटींचा हा प्रस्ताव आहे. सांगली फाटा येथे महामार्गाची उंची वाढविण्याचे नियोजन आहे.

या ठिकाणी उड्डाण पूल आणि नियमित रस्ता अशा दुहेरी वाहतुकीऐवजी आता एकाचवेळी उड्डाणपुलावरून ये-जा करणारी समांतर वाहतुकीची सोय होणार आहे. प्रस्ताव तयार असून तो दिल्‍लीत पाठविण्यात आला; मात्र दिल्‍लीतून निविदा प्रक्रिया न झाल्याने यंदाच्या पावसाळ्यात पुन्हा फटका बसला.

सहापदरीचे काम कधी सुरू होईल, तेव्हा होऊ दे; मात्र हे ब्लॅक स्पॉट काढण्यासाठी तातडीच्या उपयायोजनांची गरज आहे. अन्यथा पुन्हा पावसाळ्यात महापुराचे पाणी येऊन महामार्ग बंद होण्याचा धोका कायम आहे.

Back to top button