कोल्हापूर : महापुरानं होत्याचं नव्हतं केलं! | पुढारी

कोल्हापूर : महापुरानं होत्याचं नव्हतं केलं!

कोल्हापूर : दिलीप भिसे : 1990 पासून महापुराची एक ना अनेक वेळा झळ सोसावी लागली. 2019 मध्येही जबर तडाखा बसला. मात्र, आठवड्यापूर्वी रौद्ररूप धारण केलेल्या पंचगंगेच्या महापुरानं होत्याचं नव्हतं करून सोडलया… जोराने वाहणार्‍या प्रवाहाने डोळ्यादेखत भरला संसार वाहून नेला… ही कैफियत आहे येथील सुतारवाडा परिसरातील पूरग्रस्तांची… सुतारवाड्यात राहणार्‍या साडेतीनशेंवर कुटुंबीयांना महापुराचा तडाखा बसला आहे.

महापूर ओसरला, मात्र परिसरात गुडघ्याभर चिखलाचे साम्राज्य आहे. चित्रदुर्ग मठात पूरग्रस्तांनी आधार घेतला आहे.

महापुरामुळे व्हीनस कॉर्नर (कोल्हापूर) परिसर अक्षरश: उद्ध्वस्त झाला आहे. परिसरातील निवासी वस्त्यांसह किराणा दुकाने, हॉटेल्स, चहा, पानटपर्‍या, गॅरेज, भंगार विक्रेत्यांना मोठी झळ सोसावी लागली आहे. व्हीनस कॉर्नर चौकातलगत गॅरेजही कोसळले आहे. साडेतीनशेंवर व्यावसायिक फर्ममध्ये महापुराच्या पाण्याचा शिरकाव झाला आहे. आठ ते बारा फुटांपर्यंत पाणी थांबून होते.

दीड फूट चिखल-मातीचा थर!

व्हीनस कॉर्नर चौकालगत असलेल्या नाल्यातील पाण्यामुळे प्रत्येक वर्षी ही समस्या भेडसावत आहे. लगत असलेला गाडी अड्डाही महापुराच्या पाण्याने व्यापलेला असतो. यंदा त्याची तीव्रता अधिक दिसून आली. भंगार व्यावसायिकांनाही त्याची झळ सोसावी लागली आहे. नाला परिसरासह शेकडो दुकानांत चिखलमातीचा फूट-दीड फुटाचा थर साचलेला दिसून येत आहे.

आयुक्‍तांकडून पाहणी, औषध फवारणी महापुरामुळे व्हीनस कॉर्नरसह परिसराला मोठा फटका सोसावा लागला आहे. मनपा आयुक्‍त डॉ. कांदबरी बलकवडे, तत्कालीन आयुक्‍त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आज दुपारी व्हीनस कॉर्नर परिसराची पाहणी केली. परिसराची स्वच्छता मोहीम राबवून औषध फवारणी करण्यासाठी प्रशासनाला सूचना केल्या.

Back to top button