कोल्हापूर ; प्रवीण मस्के : महापूर ने प्रलयाचं रूप किती भीषण असतं, याचा अनुभव कोल्हापूरकरांना पुन्हा एकदा आला आहे. न्यू पॅलेस परिसरातील अनेकांचे संसार चिखलात गेले असून जीवनाची घडी कशी बसणार, या चिंतेने अश्रूंचा बांध फुटत आहे.
गेल्या आठवड्यात जिल्ह्यात आलेल्या महापुराने 2019 पेक्षा जास्त भयावह परिस्थिती पाहायला मिळाली. यंदाच्या महापुर मध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे.
शहरातील विविध भागांत पाणी घुसल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. न्यू पॅलेस परिसर, पुंगावकर मळा येथील महापूर ओसरल्यानंतर नागरिकांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. महापुराचे पाणी अचानक वाढत गेल्याने साहित्य दुसरीकडे नेऊन ठेवण्यास वेळ मिळाला नाही.
घरांतील प्रापंचिक साहित्यासह इलेक्ट्रॉनिक वस्तू मोठ्या प्रमाणात खराब झाल्या आहेत. घरात सात फुटांवर पाणी होते. न्यू पॅलेस परिसरातील शाळेचे मोठे नुकसान झाले आहे. शाळेतील बेंचसह इतर फर्निचर खराब झाले आहे.
गेली तीन-चार दिवस येथील घरातील खराब झालेल्या वस्तूंची अद्यापही स्वच्छता सुरू आहे. घरातील साहित्य रस्त्यावर बाहेर काढून वाळवण्यात येत आहे.
महापुराचे पाणी शिरल्याने वस्तू इतरत्र ठेवताना प्रचंड त्रास झाला. यात घरात कर्ता माणूस नसल्याने मोठ्या प्रमाणात अडचणी आल्या. घरातील लहान मुलांना संभाळू की वस्तू नेऊन ठेवू, अशी परिस्थिती ओढावली. शासनाने गरिबांकडे लक्ष देऊन त्यांना मदतीचा हात द्यावा, अशी भावना व्यक्त करताना रविना शिरोळे यांना अश्रू अनावर झाले होते.