रेशन दुकानांत बँक सुविधा, वीज, पाणी बिलाचा भरणा | पुढारी

रेशन दुकानांत बँक सुविधा, वीज, पाणी बिलाचा भरणा

कोल्हापूर : अनिल देशमुख

रेशन धान्य दुकानांत आता ‘सीएससी’ केंद्र सुरू होणार आहे. बँक व्यवहार, वीज, पाणी बिल भरण्यापासून ते अगदी मोबाईल रिचार्ज, रेशन कार्डसंबंधित प्रशासकीय कामकाज या केंद्रांत होणार आहे.

पुरवठा विभाग आणि ई-गव्हर्नन्स सर्व्हिस इंडिया लिमिटेड यांच्यात सोमवारी सामंजस्य करार झाला. यामुळे दुकानदारांबरोबरच नागरिकांनाही फायदा होणार आहे.दुकानदारांना मिळणारे कमिशन तुटपुंजे आहे, दुकानदारांचे उत्पन्न वाढेल, यासाठी गृहोपयोगी वस्तू विकण्यास त्यांना परवानगी दिली आहे. यापुढचा टप्पा म्हणून आता रेशन दुकानांतच ‘सीएससी’ केंद्र सुरू करण्यात येईल. बहुतांशी गावांत रेशन धान्य दुकान आहेत. त्यामुळे नागरिकांना या कामांसाठी तालुका, जिल्हा अथवा मोठ्या गावात, शहरात जावे लागणार नाही.

‘या’ सेवा मिळणार

बँकांचे सर्व व्यवहार, रेल्वे, विमान तिकीट, वीज, पाणी, फोन बिल, मोबाईल, डीटीएच रिचार्ज, शेतीविषयक सेवा, इन्कम टॅक्स रिटर्न, आरोग्यविषयक सेवा, नवीन रेशन कार्ड, दुबार रेशन कार्ड, नावात दुरुस्ती अर्ज आदी सेवा या केंद्रांद्वारे गावातच उपलब्ध होणार आहेत.

कमिशन आणि खर्च याचा मेळ बसत नसल्याने दुकानदार मेटाकुटीला आले आहेत. संघटनास्तरावर आणि पुणे विभागीय पुरवठा उपायुक्त त्रिगुण कुलकर्णी यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे ही केंद्रे सुरू होणार आहेत. यामुळे दुकानदारांचे उत्पन्न वाढून नागरिकांची सोय होणार आहे.
– रवींद्र मोेरे, जिल्हाध्यक्ष, रास्तभाव धान्य दुकानदार संघटना

Back to top button