वन्यजीवांचा अधिवास जपला पाहिजे : सुहास वायंगणकर | पुढारी

वन्यजीवांचा अधिवास जपला पाहिजे : सुहास वायंगणकर

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

अन्‍नसाखळीतील प्रत्येक घटक महत्त्वाचा आहे. निसर्गाचा अविभाज्य घटक असणार्‍या वन्यजीवांचा अधिवास जपला पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य वन्यजीव महामंडळाचे सदस्य सुहास वायंगणकर यांनी केले. दै ‘पुढारी’ प्रयोग सोशल फाऊंडेशनच्या वतीने ‘जागतिक चिमणी व वन दिना’निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मनपा शेलाजी वन्‍नाजी विद्यालय व डॉ.झाकीर हुसेन उर्दू शाळेतील विद्यार्थी उपक्रमात सहभागी झाले होते.

वायंगणकर म्हणाले, पक्षी निरीक्षण म्हणजे निसर्गाला अनुभवण्याची पहिली पायरी होय. विद्यार्थिदशेतच मुलांना अशाप्रकारचे निसर्ग संगोपनाचे धडे द्यावेत. बीज संकलन करून ओसाड माळरानावर नंदनवन फुलवता येऊ शकते. तापमानवाढीतून निसर्ग परिणाम दाखवत आहे. तो आपल्याला भरभरून देतो याची जाणीव ठेवून संवर्धनासाठी प्रयत्नशील असले पाहिजे. वर्ल्ड फॉर नेचरचे अभिजित वाघमोडे यांनी टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ घरटे करण्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखविले. कार्यानुभव विषयात याचा अंतर्भाव करून कार्यशाळा घेतल्या पाहिजेत असे सांगत ‘हरवलेल्या चिऊताईला परत बोलवूया, निसर्ग संवर्धन करूयात,’ असे आवाहन वाघमोडे यांनी केले.

यावेळी मुख्याध्यापक संजय नार्वेकर, शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासो कांबळे, विजय माळी, मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्ष गणी आजरेकर, विजय देसावळे, गीता घाटगे, रियाज सौदागर, परवीन नसरदी, अनिल बचाटे यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिंनी उपस्थित होते.

Back to top button