पक्षाचा आदेश… दबावतंत्र अन् शक्तिप्रदर्शन | पुढारी

पक्षाचा आदेश... दबावतंत्र अन् शक्तिप्रदर्शन

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

पोटनिवडणुकीमध्ये कोल्हापूर उत्तरची जागा काँग्रेसला सोडल्यापासून नाराज असलेले राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर दोन दिवसांनंतर कोल्हापुरात कार्यकर्त्यांसमोर आले. दोन दिवस त्यांनी आपला फोन बंद ठेवून कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु; राजेश क्षीरसागर यांचीच पक्षप्रमुखांनी समजूत काढली. मात्र, कार्यकर्त्यांसमोर येऊन क्षीरसागर यांनी शक्तिप्रदर्शन करत आपली ताकद दाखविली.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदासंघातील काँग्रेसचे उमेदवार आ. चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे पोटनिवडणुकीची चर्चा सुरू झाली. या जागेवर काँग्रेस पक्षाचा नैसर्गिक हक्क असल्याचे सांगण्यात आले. परंतु; या जागेवर शिवसेनेने दावा केल्याने दोन्ही पक्षांत जागेबाबत चढाओढ सुरू होती. या मतदारसंघातून 7 पैकी 5 वेळा शिवसेना विजयी झाल्यामुळे ही जागा शिवसेनेला सोडावी, असा आग्रह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा होता.

यावर तोडगा काढण्यासाठी मुंबईत चर्चा सुरू झाल्या.16 मार्च रोजी मुंबईत प्रथम उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या निवासस्थानी पहिली बैठक बोलाविण्यात आली होती. परंतु; या बैठकीस क्षीरसागर उपस्थित राहू शकले नव्हते. म्हणून पुन्हा 17 मार्च रोजी ही बैठक बोलाविण्यात आली. या बैठकीत जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी हा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा म्हणून आग्रही राहिले.
मात्र, काँग्रेसदेखील आपल्या मतावर ठाम राहिल्याने याबाबत पेच निर्माण झाला होता. त्यामुळे यासंदर्भातील सर्व अधिकार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्याचे ठरविण्यात आले. यामध्ये पक्षप्रमुख ठाकरे यांनी ही जागा काँग्रेसला सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर राजेश क्षीरसागर नाराज झाले.

पोटनिवडणूक लढवावी म्हणून कार्यकर्त्यांचा त्यांच्यावर दबाव होता. त्यासाठी कार्यकर्ते फोनवरून विचारणा करत होते. मात्र, क्षीरसागर दोन दिवस ‘नॉट रिचेबल’ होते. या दोन दिवसांमध्ये मुंबईत राहून त्यांनी काही नेत्यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडल्याचे समजते. महाविकास आघाडीचा रविवारी मेळावा झाला. या मेळाव्यास अपेक्षेप्रमाणे क्षीरसागर अनुपस्थित राहिले. परंतु; त्यांनी आपल्या कार्यालयासमोर शक्तिप्रदर्शन करत दबावतंत्र वापरले. याची दखल घेऊन त्यांना सोमवारी मुख्यमंत्री ठाकरे यांनी चर्चेसाठी ‘वर्षा’ बंगल्यावर पाचारण केले आहे.

Back to top button