अपूर्व उत्साहात महाकुंकूमार्चन सोहळा | पुढारी

अपूर्व उत्साहात महाकुंकूमार्चन सोहळा

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टच्या वतीने सौभाग्य व सौख्यदायी श्री महाकुंकूमार्चन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या पूर्व दरवाजा व भवानी मंडप परिसरात हा सोहळा झाला.

करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या मूर्तीची मूळ जागी पुनर्प्रतिष्ठापना होऊन 306 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या महाकुंकूमार्चन उपासनेचे आयोजन करण्यात आले होते. या सामुदायिक उपासनेत 18 पगड जातीच्या 5 हजार सुहासिनी महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कोल्हापूरसह सांगली, सातारा, पुणे-मुंबई, कोकणातील महिलांचा यात समावेश होता.

कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने करण्यात झाली. यानंतर श्री अंबाबाईचा जागर व गोंधळाचे सादरीकरण भालकर्स अ‍ॅकॅडमीतर्फे करण्यात आले. देवीची एक हजार नावे घेत कुंकूमार्चन झाले. कार्यक्रमाची सांगता देवीच्या आरतीने झाली. सर्व उपासक महिलांनी महालक्ष्मी अन्नछत्र येथे भोजन प्रसाद घेतला. संस्थेचे अध्यक्ष राजू मेवेकरी-जाधव यांनी उपक्रमाची माहिती सांगितली. सूत्रसंचालन प्रल्हाद पाटील यांनी केले. संयोजन संजय जोशी, राजेश सुगंधी, तन्मय मेवेकरी, सुनील खडके, विराज कुलकर्णी, प्रशांत तहसीलदार, आदित्य मेवेकरी, भूषण पाठक व सहकार्‍यांनी केले.

Back to top button