कोल्हापूर ; राजेंद्र जोशी : भारतीय साखर कारखानदारीत यंदा साखर उत्पादनाच्या उच्चांकाबरोबरच साखर निर्यातही उच्चांकाच्या उंबरठ्यावर आहे. यंदाच्या साखर निर्यात वर्षामध्ये (2021-22) देशातून साखर निर्यातीचा आकडा 75 लाख मेट्रिक टनांवर पोहोचेल, असा अंदाज भारतीय साखर कारखानदार संघटनेचे (इस्मा) महासंचालक अभिनाश वर्मा यांनी व्यक्त केला आहे. दुबई येथे साखर परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिली.
जागतिक बाजारात साखरेची कमतरता, ब्राझीलमध्ये दुष्काळग्रस्त स्थिती आणि थायलंडमध्ये घटलेले उत्पादन यामुळे भारताला गतवर्षी साखर निर्यातीची मोठी संधी मिळाली होती. यामुळे गतवर्षी (2020-21) 71 लाख मेट्रिक टन साखर भारतातून निर्यात झाली. यंदा हंगामाच्या प्रारंभापासूनच साखरेला मोठी मागणी आहे.
अफगाणिस्तानसारखा हक्काचा ग्राहक हातातून निसटण्याची वेळ आल्याने साखर निर्यात गतवर्षीपेक्षा कमी राहील, असा प्राथमिक अंदाज जरी व्यक्त केला असला, तरी भारतीय निर्यातदारांनी मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंतच सुमारे 63 लाख मेट्रिक टन साखर निर्यातीच्या करारावर सह्या केल्या आहेत. त्याहीपेक्षा प्रत्येक आठवड्याला नवे करार होत असल्याने गतवर्षीचा विक्रम मोडून 75 लाख मेट्रिक टन साखर निर्यातीचा नवा विक्रम प्रस्थापित होण्याची चिन्हे आहेत.
भारतामध्ये यंदा साखर उत्पादनात फेब्रुवारीअखेर 250 लाख मेट्रिक टनाचा टप्पा पूर्ण झाला आहे आणि सुमारे 450 हून अधिक कारखान्यांमध्ये अद्यापही उसाचे गाळप सुरू आहे. यामुळे 'इस्मा'ने उत्पादनाचा अंदाज बदलला असून 333 लाख मेट्रिक टन साखर उत्पादित होईल, असा अंदाज आहे.
साखर परिषदेत अभिनाश वर्मा यांनी भारतामध्ये इथेनॉल निर्मितीला मोठी गती प्राप्त झाल्याचे स्पष्ट केले. जगातील क्रूड ऑईलचे वाढते दर आणि इंधनाच्या निर्यातीवरील खर्च कमी करण्यासह प्रदूषण रोखण्यासाठी भारत सरकारने फ्लेक्सी फ्युएलचे धोरण स्वीकारल्यामुळे इथेनॉल निर्मितीमध्ये देशातील अनेक साखर कारखाने सहभागी होत आहेत. केवळ इथेनॉल निर्मितीचे उद्दिष्ट ठेवून प्रकल्प उभारणी वेगाने सुरू आहे.
यामुळे पेट्रोलमधील 10 टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट चालू वर्षीच पूर्ण होईल, अशी माहिती देताना वर्मा यांनी देशात चालू वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांतच इथेनॉल पेट्रोेल मिश्रणाची टक्केवारी सरासरी 9.34 टक्क्यांवर गेल्याचे, तर उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रात ही टक्केवारी 11 टक्क्यांवर असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, "चालू वर्षी 440 कोटी लिटर्स इथेनॉल निर्मितीचे उद्दिष्ट आहे.
2025 पर्यंत देशात 1 हजार 20 कोटी लिटर्स (10.2 बिलियन) इथेनॉल निर्मितीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे."