पन्हाळगडावर आढळला दुर्मीळ पट्टेरी धूळनागीण जातीचा साप

पन्हाळा ; पुढारी वृत्तसेवा : पन्हाळगडावर बाजीप्रभू चौक परिसरात शनिवारी दुर्मीळ पट्टेरी धूळनागीण जातीचा साप आढळून आला. बाजीप्रभू चौकात एका झुडपात पर्यटकांना साप दिसला. यावेळी सर्पमित्र निरंजन बुरुड व गजानन कोळी यांना बोलावण्यात आले. बुरुड यांनी सर्प अभ्यासक धीरज कुराडे यांना बोलावून घेतले असता त्यांनी सापाविषयी माहिती सांगितली .
ते म्हणाले, या सापाचे नाव पट्टेरी धूळनागीण (बिनविषारी) साप आहे. इंग्रजीमध्ये याला Banded Racer Argyrogena fasciolata असे म्हणतात. स्थानिक नावे नायकूळ (दक्षिण कोकण), धूरनागीण (विदर्भ), गव्हाळ्या (मराठवाडा), नागीण (गोवा), ताडजेरी (गडचिरोली) अशी आहेत.
सरासरी लांबी 75 सें.मी. (2 फूट 6 इंच) अधिकतम लांबी 134 सें.मी. (4 फूट 5 इंच) असून, हा साप दक्षिण व मध्य भारतात आढळतो. याचे खाद्य मुख्यतः उंदीर असून, वास्तव्य गवतात, झुडपांत, उंदरांच्या बिळात किंवा दगडांच्या खाचीत असते. या सापाला डिवचल्यास तो मानेचा भाग फुगवतो. त्यामुळे तो काहीसा नागासारखा दिसतो. भक्ष्य पकडल्यावर गिळण्यापूर्वी त्याला वेढे घालतो. हा साप पन्हाळा परिसरात पहिल्यांदाच सापडला आहे. या सापला सुरक्षित स्थलांतरित ठिकाणी सोडण्यात आले आहे.