Kolhapur Rain : राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे बंद! | पुढारी

Kolhapur Rain : राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे बंद!

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : Kolhapur Rain राधानगरी तालुक्यात तुरळक पडणाऱ्या सरी वगळता पावसाने उसंत घेतली. राधानगरी धरणक्षेत्रात पाऊस कमी झाल्याने सर्व स्वयंचलित दरवाजे बंद झाले आहेत.

आज (दि. २८) पाच क्रमांकाचा दरवाजा ३ वाजून २५ मीनिटांनी बंद झाला. दरम्यान, फक्त ‘बीओटी’मधून १४०० क्युसेक विसर्ग सुरू आहे.

दूधगंगा, तुळशी जलाशयातून कमी प्रमाणात विसर्ग झाल्याने नदीची पाणीपातळी कमी होत आहे. पाणी ओसरल्याने तालुक्यातील वाहतुकीचे सर्व मार्ग खुले झाले आहेत.

दरम्यान, सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कोल्हापुरातील राजाराम बंधा-याची पाणी पातळी ४३ फुट ८ इंच इतकी होती. आहे. तर जिल्ह्यातील ५४ बंधारे पाण्याखाली आहेत, अशी माहिती कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने आपल्या ट्विटर हँडलवरून प्रसिद्ध केली आहे.

चार दिवसापूर्वी राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर धरणाच्या सात स्वयंचलित दरवाजे यापैकी पाच दरवाजे खुले झाले होते. यातून व वीजगृहाच्या माध्यमातून जवळपास क्युसेकवर पाण्याचा विसर्ग भोगावती नदी पत्रात सुरू होता.

गेल्या तीन दिवसांपासून टप्प्याटप्प्याने हे दरवाजे बंद होत गेले. आज दुपारी ३.२५ वाजता पाच क्रमांकाचा दरवाजा बंद झाला. त्यामुळे धरणाचे सर्व दरवाजे बंद झाल्याचे सांगण्यात आले.

यामुळे भोगावती नदीचे पाणी झपाट्याने ओसरणार आहे व हळूहळू पंचगंगेचा ही महापूर उतरण्यास मदत होईल अशी स्थिती आहे. राधानगरी तालुक्यात पावसाची उघडझाप जाणवत आहे.

जिल्ह्यातील 47 बंधारे पाण्याखाली

जिल्ह्यातील राधानगरी धरणात 233.07 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ. भोगावती नदी- राशिवडे, हळदी, खडक कोगे, सरकारी कोगे, तारळे व शिरगाव. तुळशी नदी- बीड व आरे, कासारी नदी- यवलूज, ठाणे-आळवे, पुनाळ-तिरपन, बाजार -भोगाव, पेंडाखळे, कांटे, करंजफेन व वालोली. कुंभी नदी- कळे व वेतवडे. वारणा नदी- चिंचोली, माणगाव, कोडोली, शिगांव, मांगलेसावर्डे, तांदुळवाडी, चावरे, खोची व दानोळी. कडवी नदी- सवतेसावर्डे व सरुडपाटणे. दुधगंगा नदी- सिद्धनेर्ली, सुळकुड, बाचणी, दत्तवाड व सुळंबी. वेदगंगा नदी- निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, सुरुपली व चिखली असे एकूण 47 बंधारे पाण्याखाली आहेत.

जिल्ह्यातील धरणांमध्ये  तुळशी -93.40  दलघमी, वारणा -888.55, दूधगंगा – 606.84, कासारी- 63.06, कडवी – 71.24, कुंभी-64.98, पाटगाव- 95.61, चिकोत्रा- 40.35, चित्री – 53.41 (पूर्ण क्षमतेने भरला),  जंगमहट्टी -34.02, घटप्रभा –  44.17,  जांबरे- 23.23, आंबेआहोळ – 30.98 दलघमी इतका पाणीसाठा शिल्लक आहे.

तर बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे – राजाराम 43.3 फूट, सुर्वे 43.4, रुई 75.6, इचलकरंजी 73.9, तेरवाड 71, शिरोळ 72.3 तर नृसिंहवाडी  बंधाऱ्याची 72.3 फूट इतकी पाणी पातळी  सध्या आहे.

अधिक वाचा :

‘पुढारी’च्या रेस्क्यू बोटीने वाचवले १५ जणांचे प्राण; कराडच्या पाल येथे मदतकार्य

दै. ‘पुढारी’ रिलिफ फाऊंडेशनच्या वतीने पूरग्रस्तांसाठी अत्याधुनिक यांत्रिक बोट, दहा जीवनरक्षक जॅकेट, लहान मुलांसाठी पाच जीवनरक्षक जॅकेट, दहा बिओरिंगसह अन्य साधने काही महिन्यांपूर्वी दिली होती.

यावेळी यांत्रिक बोटीसह जीवनरक्षक जॅकेट व बिओरिंग आदी साहित्य कराड नगरपालिकेकडे सुपूर्द करण्यात आले होते. या रेस्क्यू बोटीमुळे पाल येथील नागरिकांना पुरामधून यशस्वीरीत्या बाहेर काढण्यात आले.

‘पुढारी’ने दिलेल्या रेस्क्यू बोटीमुळे नागरिकांचे प्राण वाचवण्यात यश आल्यामुळे कराड पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दै. ‘पुढारी’चे आभार मानले.

मुसळधार पावसामुळे तारळी पूल पाण्याखाली गेल्याने पाल येथील खंडोबा मंदिरासह मंदिर परिसर व व्यापारीपेठेला पुराचा वेढा पडला होता. नगरपालिकेने ग्रामस्थांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन राबवून पंधराजणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळविले.

मागील वर्षीच्या महापुरामुळे सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांना तडाखा बसला होता. मोठ्या प्रमाणात वित्तहानीही झाली होती.

‘पुढारी रिलिफ फाऊंडेशन’ने जनतेला पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन केले होते. जनतेने या आवाहनास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता.
यातून जमा झालेल्या निधीतून कराड नगरपरिषदेला जीवनरक्षक साधनांसह अत्याधुनिक यांत्रिक बोट देण्यात आली आहे.

बोटीला 25 एचपी टू स्ट्रोक इंजिन असून, त्यामुळे ही बोट अडचणीच्या व धोकादायक ठिकाणी गतिमान पद्धतीने कार्य करते.

या बोटीने पाल येथे पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यातआल्याने दै. ‘पुढारी’ व कराड नगरपालिकेस पाल नागरिकांनी धन्यवाद दिले आहेत.

Back to top button