नाईट लँडिंग : कोल्हापूरच्या ‘नाईट लँडिंग’चा विषय संसदेत | पुढारी

नाईट लँडिंग : कोल्हापूरच्या ‘नाईट लँडिंग’चा विषय संसदेत

उजळाईवाडी; दौलत कांबळे : कोल्हापूरच्या नाईट लँडिंग चा विषय अवघ्या काही तासातच संसदेमध्ये येणार आहे. हा विषय मार्गी लागावा म्हणून नागरी हवाई मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यासंदर्भात ठोस पावले उचलणार आहेत.

त्यामुळे येत्या काही दिवसात कोल्हापूरचा नाईट लँडिंगचा प्रश्न लवकरच मार्गी लागू शकतो.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर नाईट लँडिंगच्या संदर्भात असलेले अडथळे त्यासंदर्भात उपाय याचा अहवाल भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांने मागितला आहे.

सध्या १३७० मीटरचा पहिला रनवे कार्यरत असून या धावपट्टीवरून विमानाचे लँडिंग टेक ऑफ होत आहे. ५६० मीटर जादा रनवे पूर्णत: तयार झाला आहे. असा १९६० मीटरचा रनवे सद्यस्थितीला तयार आहे.

मुडशिंगी येथील ६४ एकर जमिनीचे संपादन केल्यास ३७० मीटर रनवे पुन्हा ज्यादा तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे २३०० मीटर रनवे तयार होऊ शकतो. यावरती एअर बस ३२० कोल्हापूरच्या विमानतळावर उतरू शकते.

नाईट लँडिंगसाठी अडथळे दूर होण्याची गरज..

कोल्हापूर विमानतळाच्या ०७ म्हणजेच पश्चिमेकडील बाजूस विमान लँडिंग करण्यासाठी मोठे अडथळे आहेत. ३ पॉवर ग्रेड, ३ टेलिकॉम टॉवर तसेच वैभव सोसायटीमधील काही बंगले अडथळे ठरत आहेत डीजीसीएच्या नियमानुसार ह्या अडचणी दूर होणे गरजेचे आहे.

त्यामुळे भविष्यात मोठे विमान उतरवण्यासाठी अडथळे आणि उपाय योजना करणे गरजेचे आहे. तर २५ म्हणजेच मुडशिंगीकडील बाजू सद्यस्थितीला विमान उतरून नाईट लँडिंगचा प्रश्न मार्गी लागू शकतो. या बाजूला बहुतांशी अडथळे नसले तरी महावितरणची जाणारी तार दोन किलोमीटर दूर हटवणे गरजेचे आहे. तरच त्या बाजूने नाईट लँडिंग विमान उतरू शकते.

जागेचा प्रश्‍न प्रलंबित

गड मुडशिंगीकडील ६४ एकर जागे बरोबरच तामगाव हद्दीतील १.७ एकर जमीन संपादित करणे गरजेचे आहे. तरच या विषयाला चालना मिळू शकते.

‘पुढारी’चा पाठपुरावा…

ज्योतिरादित्य शिंदे हवाई मंत्री झाल्यानंतर कोल्हापूर विमानतळाचा प्रश्न मार्गी लागणार असे दै ‘पुढारी’च्या १६ जुलैच्या अंकात वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते.

ज्योतिरादित्य शिंदे यांचे कोल्हापूरशी अतिशय घनिष्ठ संबंध आहेत. त्यांचे कुलदैवत श्री ज्योतिबा आहे.

त्यामुळे कोल्हापूरचे कनेक्टिव्हिटी बरोबरच नाइट लँडिंगचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असे या लेखात प्रसिद्ध करण्यात आले होते. दै. ‘पुढारी’ ने या संदर्भात सातत्याने पाठपुरावा केला आहे.

तसेच पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संभाजीराजे , खासदार संजय मंडलिक तसेच खासदार धैर्यशील माने यांनी या संदर्भात मंत्री शिंदे यांच्याशी चर्चा केल्याचे समजते.

सध्या १३७० मीटरच्या जुन्या रनवेवर लाईटचे काम पूर्ण झाले आहे. अडथळे दूर झाले नसल्याने तसेच ६४ एकर जागा व १.७ एकर जागा गरजेची आहे. यानंतर नाईट लँडिंगचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

Back to top button