कोल्हापूरचे बचाव कार्य थांबवले | पुढारी

कोल्हापूरचे बचाव कार्य थांबवले

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूरचे बचाव कार्य थांबवले आहे. तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने महापूर झपाट्याने उतरत आहे. मंगळवारी सायंकाळी सात वाजता राजाराम बंधार्‍यावर पंचगंगेची पातळी 45 फुटांवर आली. दरम्यान, शहरातील जनजीवन काहीसे सुरळीत झाले असून, सर्व रस्ते वाहतुकीसाठी खुले झाले आहेत. रोगराई पसरू नये, यासाठी महापालिकेच्या वतीने स्वच्छतेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

शिरोळ, आंबेवाडी व चिखलीतील पूरभागातील नागरिकांचे शंभर टक्के स्थलांतर झाल्याने बचाव पथकाने काम थांबवले आहे. करूळ घाटातील दरडी हटवण्याचे कामही पूर्ण झाले असून, रत्नागिरी रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मंगळवारी रात्रीपासून पुणे-बंगळूर महामार्ग सर्व वाहनांसाठी खुला झाला आहे.

जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 13 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, पाणी पातळी घटली असली, तरी पंचगंगा अजूनही धोका पातळीवर असल्याने नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी पुराच्या पाण्यात जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

अजूनही 411 घरे पूरबाधित आहेत. यापैकी 34 पूर्ण, तर 377 घरे अंशत: बाधित आहेत. 110 जनावरांचा मृत्यू झाला असून, 54 हजार 525 जनावरे स्थलांतरित करण्यात आली आहेत. आजअखेर पूरग्रस्त भागातील 36 हजार 615 कुटुंबांतील 1 लाख 62 हजार 564 नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले. यापैकी 1 लाख 39 हजार 491 नागरिक नातेवाईकांकडे स्थलांतरित झाले आहेत. निवारा कक्षांत 23 हजार 73 नागरिकांना हलवण्यात आले आहे.

64 बंधारे पाण्याखालीच

राधानगरी धरणात 234.54 द.ल.घ.मी. पाणीसाठा आहे. मंगळवारी दुपारी 4 च्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 1,400 व सिंचन विमोचकातून 1,428 असा एकूण 2,828 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा क्र. 5 अद्यापही खुला आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा : तुळशी-93.86 द.ल.घ.मी., वारणा-867.39 द.ल.घ.मी., दूधगंगा-600.84 द.ल.घ.मी., कासारी-63.51 द.ल.घ.मी., कडवी-71.24 द.ल.घ.मी., कुंभी -66 द.ल.घ.मी., पाटगाव-95.48 द.ल.घ.मी., चिकोत्रा-49.84 द.ल.घ.मी., चित्री-53.41 द.ल.घ.मी. (पूर्ण क्षमतेने भरला), जंगमहट्टी-32.20 द.ल.घ.मी., घटप्रभा-44.17 द.ल.घ.मी., जांबरे-23.23 द.ल.घ.मी. आंबेआहोळ-30.98 द.ल.घ.मी.kolhapur flood

बंधार्‍यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे : राजाराम 45 फूट, सुर्वे 43.7 फूट, रुई 76 फूट, इचलकरंजी 75 फूट, तेरवाड 72.11 फूट, शिरोळ 73.11 फूट, तर नृसिंहवाडी बंधार्‍याची 73.11 फूट इतकी पाणी पातळी आहे.

स्वच्छता मोहिमेला वेग

शहरातील सर्व रस्ते मंगळवरी वाहतुकीला खुले झाले. जिल्हाधिकारी कार्यालय, असेम्ब्ली रोड, महावीर गार्डन, व्हिनस कॉर्नर, दसरा चौक, विल्सन पूल वाहतुकीला खुला झाला आहे. खानविलकर पेट्रोल पंपासमोर चिखल मोठ्या प्रमाणात साठला आहे. दुचाकी घसरत असल्याने हा मार्ग बंद ठेवण्यात आला आहे. महापालिकेचे कर्मचारी पाण्याचा फवारा मारून माती काढण्याचे काम करत आहेत. हे काम पूर्ण झाल्यानंतर हा मार्गही बुधवारपासून वाहतुकीला खुला होणार आहे.

धोका पातळीपासून 2 फुटांवर पाणी

पंचगंगा नदीचे पाणी ओसरत आहे. मंगळवारी सायंकाळी पाणी पातळी 45 फुटांवर होती; पण नदीची धोका पातळी 43 फूट, तर इशारा पातळी 39 फूट आहे. अजूनही धोका पातळीच्या खाली पाणी जाण्यासाठी 2 फूट, तर इशारा पातळीच्या खाली जाण्यासाठी 6 फूट पाणी उतरणे गरजेचे आहे. रमणमळा, महावीर कॉलेजमागील परिसर, खानविलकर पेट्रोल पंपामागील परिसर, पंचगंगा तालीमनजीकचा परिसर पाण्याखाली आहे. गेल्या 24 तासांत केवळ दीड फुटाने नदीची पातळी कमी झाली आहे.

Back to top button