डॉ. डी. वाय. पाटील यांना शिवाजी विद्यापीठाचा कणबरकर पुरस्कार जाहीर | पुढारी

डॉ. डी. वाय. पाटील यांना शिवाजी विद्यापीठाचा कणबरकर पुरस्कार जाहीर

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : शिवाजी विद्यापीठातर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘प्राचार्य रा. कृ. कणबरकर राष्ट्रीय पुरस्कार’ माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांना सोमवारी जाहीर करण्यात आला. प्राचार्य कणबरकर यांच्या स्मृतिदिनी दि. 13 एप्रिल रोजी दुपारी चार वाजता पुरस्कार प्रदान समारंभ होईल, अशी माहिती कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी दिली.

माजी कुलगुरू प्राचार्य कणबरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारनिर्मितीसाठी त्यांच्या कुटुंबीयांनी विद्यापीठाकडे 25 लाख रुपयांची ठेव प्रदान केली आहे. श्रीमती शालिनी कणबरकर यांच्यासमवेत झालेल्या सामंजस्य करारातून ‘प्राचार्य रा. कृ. कणबरकर पुरस्कारा’ची संयुक्‍त निर्मिती करण्यात आली. देशातील शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा व अन्य क्षेत्रांत अत्युत्कृष्ट कामगिरी बजावणार्‍या व्यक्‍तीस दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो.

एक लाख 51 हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील संभाव्य बदलांना सामोरे जाण्याची सक्षमता असणारी शिक्षण संस्था डॉ. डी. वाय. पाटील यांनी उभारली आहे. त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन समितीने त्यांची एकमताने निवड केल्याचे शोध समितीचे सदस्य डॉ. जे. एफ. पाटील यांनी सांगितले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, प्राचार्य डॉ. बी. ए. खोत, डॉ. भालबा विभुते, डॉ. अरुण कणबरकर उपस्थित होते.

Back to top button