Ukraine Crisis: युक्रेनमध्ये अडकलेल्या कोल्हापूरच्या विद्यार्थिनीला अखेर विमान मिळालं | पुढारी

Ukraine Crisis: युक्रेनमध्ये अडकलेल्या कोल्हापूरच्या विद्यार्थिनीला अखेर विमान मिळालं

गुडाळ (आशिष पाटील) : युक्रेनमधून (Ukraine Crisis) रोमानियामार्गे भारतात येत असलेल्या कोल्हापूर येथील शाकंभरी लोंढे- पाटील या विद्यार्थिनीने बुखारेस्ट येथे दोन दिवस- तीन रात्री भारतात जाणाऱ्या विमानाची प्रतीक्षा केली. आज (शनिवार) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दिल्लीला उड्डाण केलेल्या विमानात तिला जागा मिळाली. त्यामुळे लोंढे कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. रात्री उशिरा दिल्लीत पोहोचणारी शाकंभरी रविवारी सकाळी दिल्लीहून पुण्यात येणार आहे. त्यामुळे डॉ. लोंढे पती-पत्नी पुण्याला रवाना झाले आहेत.

राधानगरी तालुक्यात गोकुळचे पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून दीर्घकाळ काम केलेले डॉ. श्याम लोंढे- पाटील यांची शाकंभरी ही द्वितीय कन्या. कोल्हापुरातील न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलमधून शालेय शिक्षण घेतल्यानंतर तिने १२ वी पर्यंतचे शिक्षण पुण्यात घेतले. वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी १५ डिसेंबर २०२१ मध्ये शाकंभरी युक्रेनमधील मायक्लोव्ही या शहरात दाखल झाली होती.

रशियाने युक्रेनवर (Ukraine) हल्ला केल्यानंतर लोंढे – पाटील कुटुंबीय आणि नातेवाईक चिंतित होते. युद्ध सुरू झाल्यानंतर मायक्लोव्ही मधील एका बंकरमध्ये इतर विद्यार्थिनीसह शाकंभरीने ३ दिवस अन्नपाण्यावाचून काढले. विद्यार्थ्यांना बंकरमध्ये अन्नपाणी मिळावे आणि त्यांना सुखरूप सीमेबाहेर काढावे, यासाठी आवाज उठविलेला शाकंभरीचा व्हिडिओ जगभरात व्हायरल झाल्यानंतर या विद्यार्थ्यांच्या सुटकेला गती आली . मायक्लोव्हीमधून तब्बल तीस तासांचा प्रवास करून शाकंभरीसह अनेक विद्यार्थी बुखारेस्टमध्ये बुधवारी रात्री पोहोचले. तीन दिवसाच्या प्रतीक्षेनंतर शाकंभरी ला दिल्ली ला येणाऱ्या विमानात आज जागा मिळाली.

दरम्यान, रोमानिया येथील भारतीय दूतावासाने बुखारेस्ट येथील एका स्टेडियममध्ये विद्यार्थ्यांच्या भोजन आणि निवासाची चांगली व्यवस्था केल्याचे शाकंभरीने माध्यमांशी बोलताना सांगितले. महाराष्ट्रातील ५६ विद्यार्थी-विद्यार्थिनी आपल्यासोबत बुखारेस्टच्या स्टेडियममध्ये होते, असेही तिने सांगितले. युक्रेनमधून विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यासाठी केंद्र सरकारची ऑपरेशन गंगा ही मोहीम प्रभावीपणे राबविली जात असल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने शाकंभरीने केंद्र सरकारचे आवर्जून आभार मानले.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ 

युद्ध युक्रेनमध्ये पण फोडणी महागली भारतात

Back to top button