राज्यात यंदा 94 कोटी लिटर्स इथेनॉलची निर्मिती | पुढारी

राज्यात यंदा 94 कोटी लिटर्स इथेनॉलची निर्मिती

कोल्हापूर :  राजेंद्र जोशी : केंद्र शासनाच्या पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणाच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाकरिता राज्यातील साखर कारखानदारीने चालू इथेनॉल वर्षासाठी (डिसेंबर 2021 ते नोव्हेंबर 2022) 94 कोटी लिटर्स इथेनॉल पुरवठ्याची तयारी दाखविली आहे. यामुळे राज्यातील हंगामादरम्यान उत्पादित झालेल्या साखरेपैकी 12 लाख मेट्रिक टन साखर इथेनॉलनिर्मितीकडे वळविली जाईल. यापैकी अधिकांश इथेनॉलनिर्मिती ही बी हेवी मोलॅसिस अथवा थेट उसाच्या रसापासून केली जात आहे.

केंद्र सरकारने चालू इथेनॉल वर्षाअखेपर्यंत पेट्रोलमधील 10 टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी देशातील ऑईल कंपन्यांनी एकत्रितपणे 458 कोटी लिटर्स इथेनॉल खरेदीची निविदा प्रसिद्ध केली होती. या निविदेला देशातील इथेनॉलनिर्मिती उद्योगांनी मोठा प्रतिसाद दिला.

20 फेब्रुवारीपर्यंत ऑईल कंपन्यांनी 416 कोटी लिटर्स खरेदीचे करार पूर्ण केले आहेत. 401 कोटी लिटर्स इथेनॉल खरेदीसाठी मागणीपत्रही रवाना झाली आहेत. चालू इथेनॉल वर्षात एकूण पुरवठ्यापैकी 20 फेब्रुवारीपर्यंत 80 कोटी लिटर्स इथेनॉलचा पुरवठा पूर्ण झाला आहे. या पुरवठ्यामुळे देशातील पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण 9.07 टक्क्यांवर पोहोचले आहे.

देशातील साखरेचा शिल्लक साठा कमी व्हावा आणि इंधनाच्या परदेशातून होणार्‍या आयातीवरील अवलंबित्व कमी व्हावे. तसेच त्यावर खर्ची पडणार्‍या परकीय चलनात कपात करण्याकरिता केंद्राने पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला. त्यासाठी इथेनॉलला समाधानकारक आधारभूत किंमत देण्यात येत आहे. प्रकल्पांच्या उभारणीसाठी वित्तीय कंपन्यांमार्फत सवलतीच्या व्याज दराने दीर्घ मुदतीने कर्जपुरवठा करण्यात येत आहे.

या धोरणाचा इथेनॉलच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मोठा हातभार लागला आहे. विशेष म्हणजे, रशिया-युक्रेन यांच्यादरम्यान युद्ध भडकल्यानंतर जगातील क्रूड ऑईलच्या किमतीने प्रतिबॅरल 110 डॉलर्सचा टप्पा ओलांडून आगेकूच सुरू ठेवल्याच्या पार्श्वभूमीवर या इथेनॉल प्रकल्पाचे महत्त्व अधिक अधोरेखित होऊ लागले आहे.

  • ऑईल कंपन्यांच्या इथेनॉल खरेदी निविदेला प्रतिसाद
  • वर्षात 458 कोटी लिटर्स इथेनॉल खरेदी करणार
  • 20 फेब्रुवारीपर्यंत 416 कोटी लिटर्स खरेदीचे करार

Back to top button