कोल्हापूर NH4 : महामार्गावर अद्याप अडीच फूट पाणी!, वाहतुकीसाठी सोमवार उजडणार | पुढारी

कोल्हापूर NH4 : महामार्गावर अद्याप अडीच फूट पाणी!, वाहतुकीसाठी सोमवार उजडणार

शिये; पुढारी वृत्तसेवा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पुलाची शिरोली येथील बुधले मंगल कार्यालयाजवळ महामार्गावर पुण्याकडे जाणाऱ्या रस्तावर रविवारी सांयकाळी सुमारे दहा फुट पाणी आहे.

तर पुण्याकडून येणाऱ्या रस्तावर सुमारे अडीच फुट अद्याप ही पाणी आहे. उद्या सोमवारी (दि. 26) सकाळी जेसीबी सारखे अवजड वाहनाचे पहिल्यांदा प्रात्यक्षिक घेऊनच रस्ता वाहतुकीसाठी योग्य असल्याची खात्री झाल्यानंतर वाहतुक सुरू केली जाईल, अशी माहिती पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना दिली. यामुळे रविवारी रात्री रस्ता खुला होणार नाही, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

शुक्रवारी रात्री महामार्गावर पुराचे पाणी आल्याने प्रथमतः पुणेकडे जाणारा रस्ता बंद करुन एकाच रस्त्याने दुहेरी वहातुक सुरू करण्यात आली होती, तर काही कलावधीतच पाण्याची पातळी वाढून ही सर्व वहातुक बंद करण्यात आली होती.

रविवारी पावसाने उसंत दिल्याने पाणी पातळी हळूहळू कमी होत असून सांयकाळी सात वाजण्याच्या सुमारास चार फुटाने कमी झाली. पाणी पातळी कमी होण्याचे प्रमाण अल्प असल्याने रविवारी तरी रस्ता वहातुकीसाठी मोकळा होणार नसल्याचे मत दै. ‘पुढारी’शी बोलताना सहाय्यक पोलिस निरिक्षक किरण भोसले यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, रविवारी दुपारी जेसीबी पाठवून पाण्याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. पण मध्यावर जेसीबी गेल्यानंतर पाण्याचा प्रचंड वेग असल्यामुळे जेसीबी ही परत माघारी घ्यावा लागला. शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक किरण भोसले यांनी उद्या रस्ता प्रथमतः मोठे वहान सोडून प्रात्यक्षिक घेऊन त्यानंतर अत्यावश्यक वहाने व जड वहाने पाठवून पुढे लहान मोठी वहाने सोडण्यात येतील.

दरम्यान, गेली तीन दिवस महामार्ग बंद असल्याने शेकडो वाहने रस्तावर अडकवून पडली आहेत. रस्तावर थांबून रहिलेल्या वाहनधारकांना जेवण पाण्याची व्यवस्था सामाजीक संस्थाकडून सुरु आहे. या पुलाची शिरोली येथील मदरसामध्ये अनेकांना रहायची जेवणाची व्यवस्था केली आहे. तर नागाव येथील आंबेडकर नगरमधील सिद्धार्थ समुहाचे वतीने जेवण वाटप करण्यात येत आहे.

पुलाची शिरोली व हालोंडी या हातकणंगले तालुक्यातील तर शिये या करवीर तालुक्यातील रहिवासी वस्तीतील पाणी ओसरल्याने घरातील साफसफाई करण्यात नागरीकांनी सुरुवात केली आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले असून याची धास्ती लागून राहिली आहे.

Back to top button