कोल्हापूर महापूर : पुराला उतार; पण वेढा कायम | पुढारी

कोल्हापूर महापूर : पुराला उतार; पण वेढा कायम

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर मधील महापुराची स्थिती कायम आहे. मात्र दिवसभर पावसाने उघडीप दिल्याने महापुराला किंचित उतार येत आहे. शहर आणि परिसराला वेढा मात्र कायम आहे. गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूर शहर व जिल्ह्यात हाहाकार माजवलेल्या पावसाने शनिवारी मात्र विश्रांती घेतली.

महापुराला किंचित उतार असून, शहर आणि परिसराला वेढा मात्र कायम आहे. शनिवारी सूर्यनारायणाचे दर्शन झाल्याने कोल्हापूरकरांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी जनजीवन विस्कळीतच आहे.

शुक्रवारी रात्री विक्रमी 56.3 फुटांवर असलेली राजाराम बंधार्‍याची पाणी पातळी शनिवारी रात्री 10 वाजता 53 फुटांवर आली आहे. चिखली गावाला पुराचा वेढा असून, ‘एनडीआरएफ’चे पथक नागरिकांना स्थलांतरित करत आहे.

दरम्यान, पुणे-बंगळूर महामार्गावर अजूनही पाणी असून, वाहतूक बंदच आहे.

मोबाईल, इंटरनेट सेवा विस्कळीत झाली असून, निम्मे शहर आणि जिल्हा अंधारात आहे. शुक्रवारपासून 76 हजार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले असून, 366 गावे बाधित आहेत.

तीन-चार दिवसांपासून कोल्हापूर शहर व जिल्ह्यात हाहाकार माजवलेल्या मुसळधार पावसाने शनिवारी दिवसभर विश्रांती घेतली; पण शहर व जिल्ह्यातील पुराचा वेढा कायम आहे. शनिवारी दिवसभरात लष्कर व ‘एनडीआरएफ’च्या पथकांनी 76 हजार 26 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले.

जिल्ह्यातील 366 गावे अजूनही पूरबाधित आहेत. सात नागरिकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 48 तासांत जिल्ह्यात सर्वाधिक 700 मि.मी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील 98 बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत. जिल्ह्यातील दोन महामार्गांसह 73 मार्ग वाहतुकीसाठी बंद असून, 17 राज्य मार्ग व 55 जिल्हा मार्ग बंद आहेत. राधानगरी धरण 96.17 टक्के टक्के भरले आहे.

तीन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे शहराला बेटाचे स्वरूप प्राप्‍त झाले होते. शनिवारी पहाटेपासून पावसाने उघडीप दिली. सकाळी सूर्यनारायणाचे दर्शन झाल्याने कोल्हापूरकरांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

लष्कराची 70 जवानांची एक तुकडी दाखल

पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या मदतीसाठी जिल्ह्यात लष्कराचे पथक दाखल झाले आहे. या पथकात 70 जवानांचा समावेश आहे. भारतीय आपत्ती निवारण दलाच्या शनिवारी आणखी 3 तुकड्या जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. सकाळपासूनच त्यांनी बचाव कार्याचे कामकाज युद्धपातळीवर सुरू केले आहे. ‘एनडीआरएफ’ पथकप्रमुख बि—जेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली – 4, यू. एस. प्रसाद – 1, तर शिवप्रसाद राव यांच्या नेतृत्वाखाली 1 अशी एकूण 6 पथके अनुक्रमे करवीर तालुक्यातील आंबेवाडी, चिखली, हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी, शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडी व टाकळी या ठिकाणी कार्यरत राहणार आहेत.

लष्कराच्या तुकडीचे प्रमुख मेजर एस.एस.बिस्ट यांच्या नेतृत्वाखाली शिरोळ तालुक्यातील दत्तवाड, जुने व नवे दानवाड, राजापूर, खिद्रापूर, राजापूरवाडी, अकिवाट, बस्तवाड, मजरेवाडी, घोसरवाड, लाटवाडी, हेरवाड, कुरुंदवाड, तेरवाड, अब्दुललाट, शिरदवाड, शिवनाकवाडी आदी गावात लष्करामार्फत बचावकार्य मोहिम राबविण्यात येणार आहे. या बचाव कार्यासाठी टाकळी येथील स्वराज्य अ‍ॅकॅडमी येथे लष्करी तळ उभारण्यात आले आहे.

शिरोळमधून सर्वाधिक स्थलांतर

जिल्ह्यातील 76 हजार 26 नागरिकांचे स्थलांतरण करून त्यांना सुरक्षीत स्थळी हालवण्यात आले आहे. यापैकी 67 हजार 126 नागरिक आपल्या नातलगांकडे गेली आहेत. एकट्या शिरोळ तालुक्यातून 29 हजार 284 जणांचे स्थलांतरण करण्यात आले आहे. लष्कराच्या पथकाने शिरोळ तालुक्यावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. एनडीआरएफच्या पथकाने चिखली, आंबेवाडी, गावातील नागरीकांचे स्थलांतरण सुरु केले आहे.

98 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 1400 क्युसेक्स विसर्ग

शनिवारी दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून वीज निर्मितीसाठी 1400 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 88.14 दलघमी, वारणा 905.96 दलघमी, दूधगंगा 547.12 दलघमी, कासारी 63.52 दलघमी, कडवी 71.24 दलघमी, कुंभी 65.06 दलघमी, पाटगाव 91.42 दलघमी, चिकोत्रा 43.12 दलघमी, चित्री 53.41 दलघमी (पूर्ण क्षमतेने भरला), जंगमहट्टी 29.28 दलघमी, घटप्रभा 44.17 दलघमी, जांबरे 23.23 दलघमी, आंबेआहोळ 30.98, कोदे (ल.पा) पूर्ण क्षमतेने भरला आहे.

बंधार्‍याची पाणी पातळी पुढील प्रमाणे : राजाराम 54.5 फूट, सुर्वे 51.08 फूट, रुई 79 फूट, इचलकरंजी 75 फूट, तेरवाड66.4 फूट, शिरोळ 66.11 फूट, नृसिंहवाडी 67.01 फूट.

जिल्ह्यातील 399 नळपाणी केंद्रे बंद

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 399 नळपाणी केंद्रे बंद आहेत. यातील 38 केंद्रे 24 तासांत, 82 केंद्रे 48 तासांत तर उर्वरित केंद्रे नंतर सुरू होणार आहेत.

Back to top button