कोल्हापूर : कारागृहाच्या भिंतींआड शिक्षणाचे धडे | पुढारी

कोल्हापूर : कारागृहाच्या भिंतींआड शिक्षणाचे धडे

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : आयुष्यात हातून घडलेल्या एका चुकीमुळे अनेकांना चार भिंतींआडचे कारागृहातील जीवन जगावे लागते आहे. शिक्षणाच्या अभावाने अनेकजण गुन्हेगारी क्षेत्राकडे वळतात. कारागृहातील पश्‍चात्तापाची वेळ न येता त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम प्रशासन करीत आहे. कळंबा मध्यवर्ती कारागृहातही बारावी, पदवी, व्यवसायाभिमुख शिक्षण देण्यात येत असून, गेल्या सहा वर्षांत 146 जण पदवीधर झाले आहे. यंदाही तब्बल 219 जण पदवीचे शिक्षण घेत आहेत.

यशवंतराव चव्हाण मुक्‍त विद्यापीठ आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्‍त विद्यापीठाचे अभ्यासक्रम कळंबा कारागृहात शिकवले जात आहेत. यंदाच्या 2021-22 वर्षासाठी 118 जणांनी बारावी पूर्वतयारीची परीक्षा दिली आहे, तर कला शाखेच्या पहिल्या वर्षासाठी 118 जण शिक्षण घेत आहेत. दुसर्‍या वर्षात 15 जण, तर तृतीय वर्षात 6 जण शिकत आहेत.

मागील वर्षी बारावी सम अभ्यासक्रमासाठी 123 जणांनी प्रवेश घेतला होता. कला शाखा प्रथम वर्ष 13 जण, द्वितीय वर्ष 14 जण, तर तृतीय वर्षात 07 जण असे एकूण 157 जण शिक्षण घेत होते. ही संख्या प्रत्येक वर्षी वाढत चालली आहे. पदवीसोबतच अन्‍न व पोषण प्रमाणपत्र अभ्यासक्रम, मानवाधिकार प्रमाणपत्र अभ्यासक्रम, गांधी आणि शांती पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू असून, मागील वर्षी यासाठी 72 जणांनी प्रवेश घेतला होता.

वैचारिक पातळी वाढविणार : चंद्रमणी इंदूरकर (अधीक्षक) जे बंदी निरक्षर आहेत, त्यांच्याकरिता बंदी साक्षरता वर्ग सुरू आहेत. कारागृहातील अधिकारी, बंदीशिक्षक यांच्या योगदानातून शिक्षणाची गंगा वाहते आहे. या माध्यमातून बंद्यांची वैचारिक पातळी वाढविण्याचा आमचा प्रयत्न राहील.

बंदी शिक्षकांचेही योगदान

पूर्वाश्रमी शिक्षण क्षेत्रात काम करणारे अनेक शिक्षकही सध्या गुन्?ह्यांमध्ये शिक्षा भोगत आहेत. अशा बंदी शिक्षकांच्या मदतीने कारागृहातील शिक्षणवर्ग चालविले जात आहेत. हे शिक्षक आपल्या परीने यासाठी मदत करीत आहेत. त्यांनी आतापर्यंत बंदी विद्यार्थ्यांना धडे गिरविण्यास प्रोत्साहित केले आहे.

चौघे पदव्युत्तर पदवीधर

2006 साली कळंबा कारागृहामध्ये अभ्यास केंद्र सुरू करण्यात आले होते. या माध्यमातून आतापर्यंत 146 बंदी बी. ए. पदवीधर बनले आहेत. यामध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगणार्‍या प्राजक्ता शेलार या महिला बंदीचाही समावेश आहे. तर 4 जणांनी पदव्युत्तर पदवीही प्राप्त केली आहे.

शिक्षेत मिळते सूट

कारागृहातून पदवीचे शिक्षण पूर्ण करणार्‍या बंदीला शिक्षेत 90 दिवसांची सूट वरिष्ठ कार्यालयाकडून दिली जाते, तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केल्?यास 60 दिवसांची सूट मिळते.

Back to top button