अज्ञात वाहनाच्या धडकेत शिवसेना नेते अशोकराव भावके ठार; अपघात की घातपात? | पुढारी

अज्ञात वाहनाच्या धडकेत शिवसेना नेते अशोकराव भावके ठार; अपघात की घातपात?

उंडाळे: पुढारी वृत्तसेवा

संतकृपा शिक्षण संस्थेचे संस्थापक, मातोश्री उद्योग समूहाचे मार्गदर्शक संस्थापक, शिवसेना नेते अशोकराव भावके अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार झाले. मंगळवार दि. 15 रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास कराड -चांदोली रोडवर संतकृपा शिक्षण संस्थेच्या समोर ही घटना घडली.

अशोकराव भावके : अपघात की घातपात चर्चेला उधाण…

अशोकराव भावके यांचा अपघात की घातपात याबाबत सध्या विभागात जोरदार चर्चा सुरू आहे. धडक दिलेली कार लाल रंगाची होंडासिटी असल्याचेही अनेक ठिकाणच्या सीसीटीव्हीतून दिसून आले. परंतु ती कार नेमकी कोठे गेली? कोणती व किती नंबर ? याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. अपघात झालेल्या ठिकाणी सदर कारचा आरसा मिळाला असून घटनास्थळावरून तो पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या चार दिवसांपासून अशोकराव भावके हे घोगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीसाठी प्रचारात सहभागी झाले आहेत. मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास कॉलेज समोर असणाऱ्या मातोश्री हॉटेलमध्ये ते जेवणासाठी आले होते. संतकृपा फार्मसी कॉलेज कॅम्पसमध्ये आपली चार चाकी गाडी पार्क करून ते मातोश्री हॉटेलवर जेवणासाठी कराड-चांदोली रस्ता ओलांडत असताना त्यांना अज्ञात कारने जोरदार धडक दिली. या अपघातात ते बेशुद्धावस्थेत रस्त्यावर पडले. उपचारासाठी त्यांना त्वरित कराडच्या कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

शिवसेना या राजकीय पक्षातून कार्याला सुरुवात

अशोकराव भावके यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात शिवसेना या राजकीय पक्षातून आपल्या कार्याला सुरुवात केली होती. 1995 साली स्वर्गीय विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या विरोधात शिवसेनेच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक लढवली. त्यावेळी ते पराभूत झाले. तरीही शिवसेनेची सत्ता आल्यानंतर शिवसेनेने त्यांना प्रादेशिक निवड मंडळावर सदस्य म्हणून संधी दिली. त्यानंतर काही कालावधीतच त्यांनी विभागातील विद्यार्थ्यांना इंजिनियरिंग, टेक्निकल असे शिक्षण मिळावे यासाठी घोगाव येथे संतकृपा शिक्षण संस्थेची स्थापना करून त्या माध्यमातून फार्मसी इंजिनियरिंग इंग्लिश मीडियम जुनिअर कॉलेज अशी विविध कॉलेज सुरू केली. याशिवाय गावातील विकास सेवा संस्था, ग्रामपंचायत यावरही त्यांनी आपले वर्चस्व राखले.

विकास सेवा सोसायटीची निवडणूक

सध्या घोगाव विकास सेवा सोसायटीची निवडणूक लागली होती. या निवडणुकीत त्यांचे पॅनेल उभे आहे. या धामधुमीत त्यांचा अपघात झाल्याने गावासह विभागावर शोककळा पसरली आहे. घटनेचे वृत्त कळताच विभागातील सर्व व्यवहार बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या पार्थिवावर उद्या गुरुवारी घोगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, वडील, चुलते असा मोठा परिवार आहे.

पाहा व्हिडिओ : संजय राऊत यांचा ED, CBI चौकशीवरून भाजपवर हल्लाबोल | भाजप नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप

Back to top button